जळगाव : दुष्काळ परिस्थिती आणि त्यातच निवडणुकांची शक्यता असल्याने यंदाचा जानेवारी महिन्यात होणारा कृषी महोत्सव कृषी विभागाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांशी चर्चा करून याबाबतचे पत्रच कृषी आयुक्तांना पाठवून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत कृषी विभागाच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कृषी महोत्सव रद्द केला असला तरी एप्रिलमध्ये धान्य महोत्सव घेणार असल्याचे सांगितले.कृषी महोत्सव हा राज्य शासनाच्या कृषी विभागाला मिळणाऱ्या निधीतून जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भरविण्यात येतो. तर धान्य महोत्सव हा ‘आत्मा’च्या निधीतून एप्रिल महिन्यात भरविण्यात येत असतो. मात्र राज्य शासनाचा निधी हा मार्चअखेरपर्यंत खर्ची पडला पाहिजे, असे बंधनकारक असल्याने कृषी महोत्सव त्याआधीच घेणे भाग असते. मात्र जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ज्वारी, बाजरी, तूर हे मार्चच्या पुढेच बाजारात येत असल्याने जानेवारी-फेब्रुवारीत कृषी महोत्सव घेऊन त्यात काय मांडायचे? असा प्रश्न असतो. त्यामुळे हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी एप्रिलमध्ये धान्य महोत्सव घेण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रत्यक्षात खरीपाचे धान्य दाखलप्रत्यक्षात मात्र खरीपाचे धान्य बाजारात दाखल झाले आहे. शासनाचेच भरडधान्य खरेदी केंद्र तसेच तूर, उडीद, मूग खरेदी केंद्रांवर देखील धान्य खरेदी सुरू आहे. खरीपाच्या उत्पन्नाचे आकडेवारी कृषी विभागाकडे जमा करणे सुरू आहे. त्यामुळे दुष्काळ असला तरी धान्याचे उत्पादनच झालेले नाही, अशी परिस्थिती नाही. तसेच धान्य जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असतानाच बाजारात आले आहे. तरीही धान्य आलेले नसते, हा दावा कितपत खरा आहे? याबाबतच साशंकता व्यक्त होत आहे. तर निवडणुकांची अडचण जानेवारी, फेब्रुवारीपेक्षा एप्रिलमध्येच अधिक येऊ शकते, अशी स्थिती आहे.तर कृषी तंत्रज्ञान मांडणे झाले असते शक्यशासनाकडून कृषी विभागाला शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संपर्क व्हावा यासोबतच यंत्रसामुग्री उत्पादक व शेतकरी यांच्यातही थेट संपर्क व्हावा, नवीन तंत्रज्ञान त्यांना समजावे, हा देखील उद्देश ठेवून कृषी महोत्सव, धान्य महोत्सव यासारखे महोत्सव भरविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असते. त्यासाठी कृषी महोत्सवाकरीता तब्बल १५ ते १७ लाखांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला जात असतो. मात्र निधी उपलब्ध असतानाही केवळ कृषी विभागाने ‘नकारात्मक’ विचार केल्याने अथवा दृष्टीचा अभाव असल्याने हा महोत्सव रद्द केल्याचा आरोप जाणकारांकडून केला जात आहे.
दुष्काळामुळे कृषी महोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:39 PM
जिल्हा प्रशासनाकडून कृषी आयुक्तांना पत्र
ठळक मुद्दे एप्रिलमध्ये धान्य महोत्सव घेणार