विजयकुमार सैतवालजळगाव : राजस्थान, मध्यप्रदेशातील निवडणुकांमुळे जळगावच्या बाजारपेठेत धान्याची आवक थांबल्याने बाजारपेठेत धान्याची कमतरता जाणवू लागली. मात्र मागणी नसल्याने भाव स्थिर आहे.जळगावच्या बाजारपेठेत गहू, कडधान्य, बाजरी यांची आवक राजस्थान, मध्यप्रदेशातून होत असते. मात्र तेथे विधानसभेच्या निवडणुका असल्याने गेल्या आठवड्यापासून धान्याची आवक कमी झाली होती. सध्या खरेदीचा हंगामही नसल्याने बाजारपेठेत धान्याला मागणी नव्हती. त्यामुळे आवक नसली तरी भाव स्थिर राहिले.बाजारपेठेत नवीन तांदुळाची आवक सुरू झाली असून जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे भाव कमी असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे.रब्बी हंगामात लागवड होणाऱ्या दादरच्या भावात वाढ सुरू असून या आठवड्यात थेट २०० प्रती क्विंटलने दादरच्या भावात वाढ होऊन ती ३००० ते ३२०० रुपये प्रती क्विंटलवरून ३२०० ते ३४०० प्रती क्विंटलवर पोहचली आहे. गेल्या आठवड्यात डाळींचे कमी झालेले भाव या आठवड्यात स्थिर राहिले, अशी माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.दोन आठवड्यांपूर्वी ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाच्या डाळीच्या गेल्या आठवड्यात घट होऊन ती ७००० ते ७४०० रुपयांवर आली होती. या आठवड्यातही ती याच भावावर स्थिर आहे. उडीदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६३०० रुपये प्रती क्विंटल, हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत. दोन आठवड्यांपूर्वी तूरडाळीच्या भावात वाढ झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात होऊन ती ७००० ते ७४०० रुपये प्रती क्विंटलवर आली. या आठवड्यातही ती याच भावावर स्थिर आहे.चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ६६७५ रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. तसेच चांगल्या दर्जाच्या उडिदाचे भावदेखील ५६०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.नवीन तांदुळाचा हंगाम सुरू झाला असून छत्तीसगड, मध्यप्रदेशसह गोंदिया, तुमसर या भागातून नवीन तांदूळ येऊ लागला आहे. नवीन चिनोर तांदुळाचे भाव ३००० रुपये प्रती क्विंटल असून जुन्या चिनोर तांदळाचे भाव ३४०० रुपये प्रती क्विंटल आहे.गव्हाला मागणी वाढल्याने १०० रुपये प्रती क्विंटलने गव्हाच्या भावात वाढ झाली होती. मात्र या आठवड्यात हे भाव स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा आहे. १४७ गहू २६५० ते २७५० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे. तसेच लोकवन गहू २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू २७५० ते २८५० रुपये प्रती क्विंटल, चंदोसी ३८५० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे. मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक लवकरच पुन्हा सुरू होईल, अशी माहिती व्यापाºयांनी दिली.ज्वारी, बाजरीचे भावदेखील या आठवड्यात स्थिर आहेत. ज्वारीचे भाव २००० ते २१०० रुपये प्रती क्विंटल, बाजरी २२०० ते २३०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, चिखली, मेहकर, अकोला या भागातून मुगाची आवक होते तर उडिदाची जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून आवक होत असते, मात्र यंदा पावसाच्या कमी प्रमाणामुळे सर्वच ठिकाणाहून येणाºया मालाची आवक घटली आहे.
मध्यप्रदेश, राजस्थानातील निवडणुकांमुळे जळगावात धान्याची आवक थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:35 AM