जळगाव / धुळे : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असल्याने आचारसंहिता संपुष्टात येण्याच्या सूचना मिळाल्या नसल्या तरी निकालानंतर आचारसंहिता संपुष्टात येते, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. मात्र दुसरीकडे खासदारांचे नावे गॅझेटमध्ये प्रकाशित होणे बाकी असल्याने सोमवारपर्यंत आचारसंहितेचा अंमल राहणार असल्याचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीसाठी १० मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली होती. कोणत्याही निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येते, असे संकेत असतात. त्यानुसार २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याने ही आचारसंहिता संपुष्टात आली आहे, मात्र अद्याप तशा सूचना प्राप्त झाल्या नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिली.निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीनंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित खासदारांची नावे गॅझेटमध्ये प्रकाशित होईपर्यंत आचारसंहिता लागू असते, अशी माहिती धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.निकालानंतर नवनिर्वाचित खासदारांची नावे गॅझेटमध्ये प्रकाशित होण्यास तीन-चार दिवस लागतात. त्यानंतर मात्र आचारसंहिता संपेल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान, पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता त्यासंदर्भातील उपाययोजनांसाठी या पूर्वीच आचारसंहिता शिथील करण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात, अद्याप सूचना नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:50 AM