रावेर - उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी परीक्षेच्या उद्या बुधवारी घोषित होऊ घातलेल्या निकालातील अपयशाच्या भीतीने तालुक्यातील अहिरवाडी येथील विद्यार्थ्यांनी पूजा भगवान चौधरी (वय १८) या विद्यार्थिनीने राहत्या घराच्या छताला तिच्या स्वतःच्या ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी रावेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अहिरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान लहानू चौधरी यांची एकुलती एक कन्या पूजा भगवान चौधरी ही केर्हाळे येथील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून, तिने मार्च २०१८ ची इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. दरम्यान, सदर बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी जाहीर होऊ घातला असतानाच तिने परीक्षेतील अपयशाच्या भीतीपोटी राहत्या घराच्या छताला स्वतः च्या ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची दुर्दैवी घटना मृत पूजा हिच्या राहत्या घरी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. आईवडिलांची लाडक्या पूजाने परीक्षेच्या निकाल घोषित होण्यापूर्वीच अपयशाचा धसका घेऊन मृत्यूला कवटाळून घेतल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.मृत पूजा हिचे काका सुनील गबा चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पाटील व डॉ. संदीप पाटील यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान अहिरवाडी येथे शोकाकुल वातावरणात मृत पूजा हिच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई, वडील व भाऊ गोकूळ असा परिवार आहे. केर्हाळे येथील माजी सरपंच तथा शिवसेना विभागप्रमुख अनिल पाटील यांची ती भाची होत. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ श्रीराम वानखेडे हे पुढील तपास करीत आहेत.
बारावी परीक्षेच्या निकालातील अपयशाच्या भीतीने विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 5:45 PM