जळगाव, दि. 23 - ज्या मुलाच्या शिक्षणासाठी पित्याने कर्ज घेतले त्याच मुलाने वडील कजर्बाजारी होत असल्याच्या विचारातून गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसरीकडे पोटच्या गोळ्य़ाच्या उपचारासाठी वेळेवर पैसे मिळत नसल्याने पित्याने विषप्राशन केल्याची ह्रदयद्रावक घटना शनिवारी जळगाव जिल्ह्यात घडली.
पळसोदच्या तरुणाने घेतला गळफासजळगाव तालुक्यातील पळसोद येथील रहिवासी व एका खाजगी कंपनीत कामाला असलेले भगवान पाटील यांना डिगंबर व महेश ही मुले आहेत. यातील डिगंबरच्या शिक्षणासाठी भगवान पाटील यांनी चार-पाच दिवसांपूर्वीच दीड लाखाचे कर्ज घेतले. त्यात अगोदरच भोकर विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज असल्याने वडील अधिक कजर्बाजारी होत आहे व ते कसे कर्ज फेडतील याच तणावात डिगंबर राहत होता. त्याला कुटुंबीयांनी समजवून व धीर देण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो त्याच मनस्थितीत होता. शनिवारी तो आजीसह शेतात काम करीत असताना त्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गळफास घेतला व आपली जीवनयात्रा संपविली. घरी असलेला महेश हा त्याचा भाऊ शेतात गेला असता त्याला डिगंबरने गळफास घेतल्याचे दिसून आले. हे दृष्य पाहून तो हादरून गेला. त्यानेच डिगंबरला खाली उतरविले व इतरांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र तेथे त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या ठिकाणी त्याचे वडील भगवान पाटील व भाऊ महेश यांना शोक अनावर झाला होता.
मुलाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पिता अस्वस्थ दुस:या एका घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील धाबेपिंप्री येथील भरत चरणसिंग भिलाले (27) या पित्याने मुलाच्या उपचारास हक्काचे पैसे मिळत नसल्याने विषप्राशन केले. भरत भिलाले यांचा मुलगा आजारी असल्याने त्यास मुक्ताईनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोलमजुरी करणारे भरत भिलाले हे ज्या ठिकाणी काम करतात तेथे आपल्या मजुरीचे पैसे मागूनही मिळत नसल्याने व आपण पोटच्या गोळ्य़ास वेळेवर पैसे लावू शकत नसल्याने पिता अस्वस्थ झाला व त्याने शनिवारी विषप्राशन केले. त्यानंतर भिलाले यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.