एरंडोल: दहिगाव बंधाऱ्यात गुरुवारी सकाळी गिरणेच्या चौथ्या आवर्तनाचे पाणी पोहचले असून शुक्रवारी सकाळी हे पाणी लमांजन बंधाºयात पोहचेल अशी अपेक्षा आहे. यामुळे एरंडोल तालुक्याला ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळाला आहे.दहिगाव बंधारा पाण्याने भरल्यामुळे एरंडोल तालुक्यातील कासोदा, आडगाव, तळई या मोठ्या गावांसह दक्षिण भागातील सर्व गावांना पिण्याचे पाणी मे व जून साठी उपलब्ध होणार आहे. आडगावसह सोळागाव सामूहिक पाणी पुरवठा योजनेला यामुळे नव संजीवनी प्राप्त होणार आहे. तसेच लमांजन बंधाºयात पाणीसाठा झाल्याने एरंडोल शहराला आकास्मीक योजनेद्वारे दोन ते तीन महिने पाणी पुरवठा होवू शकेल.याशिवाय गिरणेच्या काठावरील व परिसरातील उत्राण, हनुमंत खेडे, नागदुली, दापोरी, खर्ची बुद्रुक, खर्ची खुर्द, रवंजे बुद्रुक, रवंजे खुर्द आदी गावांना गिरणामाई टंचाई काळात तारणार आहे. एकंदरीत एरंडोल तालुक्यातील जवळपास एरंडोल शहरासह निम्म्यापेक्षा अधिक गावांची तहान गिरणेच्या पाण्याने भागविणे शक्य होणार आहे .दहिगाव बंधाºयात ४३ द. ल. घ. फू. पाणीसाठा तर लमांजन बंधाºयात ६० ते ७० द. ल. घ. फू. इतका जलसाठा होणार आहे. त्यामुळे गिरणा नदी वरील पाणी योजनांच्या लाभार्थी गावांची पाणीटंचाई मार्गी लागणार आहे, अशी माहिती एरंडोल गिरणा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी मकरंद अत्तरदे यांनी 'लोकमत'ला दिली.
‘गिरणा माई’च्या चौथ्या आवर्तनामुळे एरंडोल तालुक्याला ऐन उन्हाळ्यात दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 4:00 PM