गुढे, ता. भडगाव : सकाळची बस ही नेहमीच भरुन येत असल्याने अनेकदा बसमध्ये चढायलाही मिळत नाही, या कारणाने गुढे येथील विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त करीत बस गुरुवारी रोखून धरली.येथे ४ रोजी सकाळी साडेसहा वाजता चाळीसगाव- भडगाव ही बस नेहमी प्रमाणे बहाळ येथुन भरुन आली. यावेळी गुढे बसस्थानकावर कोळगाव येथे महाविद्यालयात शिक्षण घेणारे चाळीस ते पन्नास पासधारक विद्यार्थी, विद्यार्थिनी बसची वाट पहात उभे होते. परंतु बस बहाळ येथील विद्यार्थ्यांनी आधीच भरली असल्याने जागा न मिळाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आणी पालकांनी गुढे बसस्टॉपवर सुमारे दोन तास ही बस अडवुन धरली होती.येथील विद्यार्थ्यांना बस मध्ये जागा मिळत नसल्याने बसचा पास काढूनही खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. येथील विद्यार्थी दररोज सकाळी साडेसहा वाजेच्या बसने कोळगावच्या गोपू पाटील विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात असतात परंतु चाळीसगाव -भडगाव बस बहाळ येथूनच पूर्ण भरुन येत असल्याने गुढे येथील विद्यार्थ्यांना बस मध्ये बसायला जागा मिळत नाही. सर्व विद्यार्थी बहाळ पासूनच उभे राहूनच प्रवास करतात. अनेकदा तर काही विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठीही बस मध्ये जागा नसते. यामुळे त्यांना नाईलाजाने खाजगी वाहनाने भाडे खर्च करुन प्रवास करावा लागतो. नेहमीच पदरमोड करून प्रवास करणे सर्वसाधारण विद्यार्थ्यांना न परवडणारे असून येथील विद्यार्थ्यांची संख्या पाहता जादाची बस सोडावी अशी मागणी आहे.दरम्यान काही बस चालक हे विद्यार्थी संख्या पाहून गुढे बस स्टॉप वर बस न थांबवतात पुढे निघून जातात. परंतु गुरुवारी सर्व विद्यार्थी गाडी समोरच उभे राहिले व बस चालकांचा नाईलाज झाला आणि गाडी दोन तास उभी करून ठेवली. जोपर्यंत पर्यार्यी व्यवस्था महामंडळ करत नाही तोपर्यंत बस जाऊ देणार नाहीत असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला तेव्हा बस चालक आणि वाहक वाहकांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क करुन ही माहिती दिली. परंतु काहीच दखल घेतली नाही.शेवटी दोन तासापर्यंत थांबलेल्या या गाडीतील प्रवाशांचा विचार करून बस भडगावच्या दिशेने सोडण्यात आली.जादाची बस सोडण्याची मागणीबस नेहमीच बहाळ येथून भरुन येत असल्याने गुढे येथील विद्यार्थ्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. तसेच काही वेळेस तर बसमध्ये शिरायलाही जागा नसते. यामुळे ही बाब लक्षात घेता गुढे येथील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बस फेरी सुरू करावी, अशी मागणी असून याबाबत संतप्त विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीमार्फत आमदार किशोर पाटील यांना निवेदन दिले आहे.
गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांनी रोखली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 9:41 PM