किरण चौधरीरावेर - मालकाकडे चुलीपासून ते उद्योग व्यवसायापर्यंत इमाने इतबारे काम करणाऱ्या पतीवर क्रुर काळाने घाला घातल्याने वयाच्या पंचवीसीतचं येथील हेमलता महाजन यांच्यावर वैधव्याचा डोंगर कोसळला. संसारवेलीवरील दुसरीत शिकणारी कांचन व तान्हुल्या कुणाल या दोन्ही फुलांना घरी कोणतीही शेतीबाळी नसतांना केवळ शेतमजूरीवर फुलवले. कांचन हिला वाघीणीचे दूध पाजण्यासाठी अर्थात शिक्षणासाठी ऊन, वारा वा पाऊस याची तमा न बाळगता रक्ताचं पाणी करून काळ्या मातीतील पीकाला निंदणीच्या खुरपीतून गुण देतांनाच, इयत्ता दहावीत ९५.६० टक्के गुण संपादन करून व बारावीच्या सीईटी परीक्षेत १०८ गुण मिळवून शहरातून पहिली आलेल्या कु कांचन हिच्या जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्नांना बळ देण्याचे काम करीत असल्याने महिला दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाला व ध्येय्याला सलाम केला जात आहे.शहरातील श्री सप्तश्रृंगी नगरातील जयंत विष्णू महाजन यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले होते.चैतन्य इंजिनीअर वर्क्स या वर्कशॉपसह मालकाच्या घरादारात इमाने इतबारे काम करणारा विश्वासू व प्रामाणिक कर्मचारी म्हणून त्यांनी प्रतिमा निर्माण केली होती. या उदरनिर्वाहाच्या भरवशावरच त्यांचा हेमलता महाजन यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना मुलगी कांचन व मुलगा कुणाल दोन अपत्य त्यांच्या संसार वेलीवर फुलली. मात्र क्रुर नियतीची दुष्ट नजर जयंत महाजन यांचे १५ वर्षांपूर्वी आजाराने ३० व्या वर्षी निधन झाले होते . पतीच्या नोकरीचा आधारवड कोसळला.घरी शेतजमीन नाही. इवलीशी कांचन दुसऱ्या इयत्तेत व मुलगा कुणाल तान्हुला असतांना हेमलता महाजन यांच्यावर तारूण्यात वैधव्याची कुºहाड कोसळली. चिमुरड्यांचे पालन - पोषण करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेवून हेमलता यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी हातमजुरीसाठी कंबर कसली.
निंदणीच्या खुरपीतून पीकांच्या वाढीला गुण देणारी विधवा माता देतेयं लेकीला जिल्हाधिकारी होण्याचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:41 AM