जळगाव : समाजात सर्वात जास्त टीका होत असलेल्या पोलीस दलात शनिवारी मान उंचावणारी अशीच एक घटना शनिवारी शहरात घडली. स्वातंत्र्य चौकात अपघातामुळे बेशुध्दावस्थेत पडून असलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकाला शहर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करुन जीवदान दिले. अशोक झिपरु पाटील (६०, रा. विद्यानगर, जळगाव) असे या निवृत्त प्राध्यापकांचे नाव आहे.प्रा. पाटील हे शनिवारी दुचाकीने घराकडून शहरात येत असताना सकाळी ९ वाजता स्वातंत्र्य चौकात चक्कर येऊन कोसळले. काही क्षणातच ते बेशुध्द झाले. या घटनेमुळे मोठी गर्दी जमा झाली, मात्र प्रा.पाटील काहीच हालचाल करीत नसल्याने कोणीही पुढे येण्याची हिंमत करीत नव्हते. त्याचवेळी हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील हे दुचाकीने पोलीस स्टेशनला जात असताना गर्दी पाहून घटनास्थळी थांबले. त्यांनी प्रा.पाटील यांच्या हाताची नाडी व श्वास तपासला. रस्त्याने जाणाऱ्या शाहू नगरातील मनोज पवार या रिक्षा चालकाच्या मदतीने प्रा.पाटील यांना रिक्षात बसवून स्वत:च जिल्हा रुग्णालयात दाखल केले.विजयसिंग पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात तातडीने डॉक्टरांना बोलावून प्रा.पाटील यांना आपत्कालीन विभागात दाखल केले.उपचारानंतर अर्धा तासाने प्रा.पाटील शुध्दीवर आले. दवाखान्यात दाखल करायला थोडा उशिर झाला असता तर कदाचित वाईट बातमी ऐकायला मिळाली असती, वेळीच उपचार मिळाल्यानेच प्रा.पाटील यांचे प्राण वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, प्रा.पाटील यांना नंतर खासगी दवाखान्यात नेण्यात आले.कुटुंबाने मानले डॉक्टर व पोलिसाचे आभार... प्रा.पाटील शुध्दीवर आल्यावर विजयसिंग पाटील यांनी प्रा.पाटील यांच्या मोबाईलवर एका क्रमांकावर फोन लावला.त्यांना घटनेची माहिती देऊन कुटुंबाला जिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना केल्या. प्रा.पाटील यांच्या पत्नी पुष्पाबाई व इतर नातेवाईक तातडीने दाखल झाले. पतीवर बेतलेला प्रसंग ऐकून त्या थक्क झाल्या. त्यांनी उपचार करणारे डॉक्टर व विजयसिंग पाटील यांना देव मानून त्यांचे डबडबलेल्या डोळ्यांनी व थरथरते हात जोडून आभार मानले. गेल्या वर्षी देखील विजयसिंग पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव यांनी अपघातातील दोन वेगवेगळ्या तरुणांचे प्राण वाचविले होते.
‘खाकी’च्या प्रसंगावधानाने निवृत्त प्राध्यापकाला मिळाले जीवदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:14 PM