दिरंगाई : शेतकऱ्यांनी पाटचारी खोदून स्वतः काढले पाणी
जळगाव : शेतात तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या रेल्वेमार्गावरील मातीचा भराव काढण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, दोन दिवसांपासून मक्तेदाराला जेसीबी मिळत नसल्यामुळे हे काम रखडले. त्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतः मक्तेदाराच्या जेसीबीची वाट न पाहता तात्पुरती पाटचारी खोदून शेताबाहेर पाणी काढले आहे.
रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम करताना, शिरसोलीच्या पुढे दापोरा शिवारात पाण्याचा निचरा होण्यासाठी बोगदा न उभारल्याने पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतातच तुंबत आहे. या प्रकारामुळे येथील शेतकरी बांधवांमधून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर, रेल्वे अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
पाण्याचा निचरा होण्यासाठी तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी उभारलेला मातीचा भराव काढण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र, दोन दिवस उलटूनही रेल्वे प्रशासनातर्फे हा भराव काढण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील शेतकरी बांधवांनी स्वतः दोन दिवस शेतात राबून हे पाणी पाटचारीद्वारे बाहेर काढले. दरम्यान, याबाबत रेल्वेचे उपमुख्य अभियंता पंकज डावरे यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी या बाबत माहिती घेऊन संबंधिताना तातडीने मातीचा भराव काढण्याबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे सांगितले.