नांदेड ता.धरणगाव : धरणगाव तालुक्यातील नांदेड व अमळनेर तालुक्यातील सावखेडा परीसरात पावसाअभावी खरिपाच्या पिकांची स्थिती अतिशय दयनीय स्वरूपाची झालेली असून, आता कोवळी पिके उन्हामुळे जळू लागल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
शासनाने आता दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पीकविम्याचा लाभ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे . तोकड्या पावसावरच शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून, दुबार तिबार पेरण्या केल्यात, परंतु पिकांच्या वाढीसाठी दमदार स्वरूपाचा पाऊसच न झाल्यामुळे आजपावेतो अधून मधून येणाऱ्या पावसाच्या शिडकाव्यावरच पिके कशीबशी तग धरून होती, परंतु आता पावसाचे शिंतोडेही बंद झाल्याने दुपारच्या वेळी असणाऱ्या उन्हामुळे कोवळी पिके आता जळू लागली आहेत. जमिनीची तहान पूर्ण भागलेली नसून खालचा भाग पूर्णतः कोरडाठाक आहे. आता तर जमिनीच्या वरच्या भागावरही कोवळ्या पिकांजवळ बारीक बारीक तडे पडायला सुरुवात झाली आहे. परिणामी, कपाशी, उडीद, मूग, तीळ, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांची वाढ खुंटलेली असून, हंगाम पूर्णतः हातचा जाण्याच्या मार्गावर आहे.
नांदेड, साळवा, सावखेडा, धावडे, मुंगसे, पातोंडा, रुंधाटी, मठगव्हाणपासून सर्वदूर हीच स्थिती आहे. बहुसंख्य शेतकरी निदान पुढे रब्बीचा हंगाम तरी चांगला येईल, या आशेने खरिपाच्या पिकांवर ओखर फिरवत असल्याचे दिसून येत आहे. पावसाअभावी मजूरवर्गाच्या हातालाही काम नसल्याने त्यांची स्थिती ही दयनीय झाली आहे .एकूणच पावसाअभावी दे माय धरणी ठाय अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पावसाची अशीच स्थिती राहिली, तर भविष्यात पेयजलाचाही प्रश्न मोठा बिकट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शासनाने सरसकट दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसह पीकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
[ फोटोः पावसाअभावी कपाशीच्या पिकाची वाढ अशी खुंटली असून, पीक जमीन सोडायला तयार नाही. छाया- राजेंद्र रडे, नांदेड ] ११/१