=============================
रावेर : प्रति पंढरपूर म्हणून तालुक्यातील भोकरी नदीच्या काठी श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिर परिसरातील विठ्ठल- रुख्मिणीचेही मंदिर असून आषाढी एकादशीनिमित्त या ठिकाणी वैष्णवांचा फुलणारा मेळा यंदाही फुलू शकणार नसल्याने ही पुण्यभूमी ओस पडणार आहे.
तालुक्यातील भोकर नदीच्या काठी भोकरी शिवारातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथील श्री ओंकनाथ महादेवांचे कपिला गायीच्या कपिलधारांखाली स्वयंभू प्रकटलेले शिवलिंग असून, ऋषी श्री अगस्ती मुनींनी या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याची व खांडववनात वनवासात असताना श्रीप्रभुरामचंद्र सीता व लक्ष्मणाने महारुद्राभिषेक केल्याची आख्यायिका आहे. भाविकांचे सकल मनोरथ सिद्धीस जाणारे जागृत देवस्थान हे मानले जाते. आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील वारकऱ्यांच्या पायी दिंड्या श्री ओंकारेश्वर महादेवाच्या प्रांगणात टाळ मृदंगाच्या गजरात येत असतात. मात्र कोरोना निर्बंधामुळे यंदा चाप बसणार आहे.
अहिल्यादेवी यांनी केला होता जीर्णोद्धार
श्री ओंकनाथ महादेव मंदिर हे पुरातन हेमाडपंती असून राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराला तटबंदी करून जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. स्वयंभू ओंकनाथ महादेवाचे जागृत शिवलिंग, तपोव्रतातील गंगामय्या, उजव्या सोंडेंचे स्वयंभू सिद्धिविनायक गणेश, कार्तिकस्वामी महाराज, श्रीराम मंदिर, श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, श्री दत्त मंदिर व भैरवनाथ यांचे मंदिर या मंदिरांत असून दक्षिणेला भोकरी नदीच्या तीरावर स्मशानभूमी असल्याने या मंदिरात शिवजींचा परिवार असलेले हे एकमेव मंदिर असल्याची अनन्यसाधारण भावना भाविकांच्या मनात आहे.
अशा या मंदिरात महाशिवरात्र, वणमासातील सोमवार, ऋषीपंचमी व आषाढी एकादशी तथा कार्तिकी एकादशी, कार्तिक पौर्णिमा आदी महोत्सव साजरे केले जातात.
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी तालुक्यातील तामसवाडी, मोरगाव, वाघोड, बोरगाव, केऱ्हाळे, भोकरी, रावेर, अहिरवाडी, पाडळे, निरूळ येथील वारकऱ्यांच्या दाखल होणाऱ्या पायी दिंड्यांना यंदा कोरोनाच्या निर्बंधात चाप घालण्यात आला असल्याने या पुण्यभूमीत विसावणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्यावर विरजण पडले आहे.