लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ब्रेक द चेन काळात कृषी क्षेत्राशी निगडित व अत्यावश्यक सेवेतील उद्योग, कारखाने सुरू असले तरी यातील दालमिल उद्योगाच्या उत्पादनावर निर्बंधांचा परिणाम होऊन डाळीचे ५० टक्के उत्पादन घटले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळा कमी झाल्याने कच्चा माल मिळण्यास व उत्पादित माल विक्रीवर परिणाम झाल्याने डाळ उत्पादनात घट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनामुळे जागतिक बाजारपेठेला चांगलेच वेढले आहे. त्यात देशाला विदेशी चलन मिळवून देण्यात मोठा हातभार असलेल्या डाळींच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. देशाच्या एकूण डाळींच्या उत्पादनात जळगावचा मोठा वाटा आहे. सध्यादेखील जळगावात ६५ दालमिल असून, त्यामधून तयार झालेल्या डाळी दररोज येथून मोठ्या प्रमाणात निर्यात होतात.
दालमिलचे उत्पादन निम्म्यावर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंध काळात दालमिल सुरू ठेवल्या तरी या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी असल्याने तसेच माल चढ-उतार करण्यासाठी लागणारे हमाल बांधवदेखील नसल्याने दालमिलचे उत्पादन घटले आहे. साधारण ७०० टन डाळ दररोज तयार होते. मात्र, सध्या अत्यावश्यक सेवेतील दुकान सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू आहे. यात कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दुकान याच वेळेत बंद होत असल्याने कच्चा माल, कडधान्य मिळण्यास अडचण होत आहे. तसेच उत्पादित डाळीची विक्रीदेखील याच वेळेच्या मर्यादेमुळे कमी झाली आहे. याचा परिणाम होऊन डाळीच्या उत्पादनात ५० टक्के घट होऊन हे उत्पादन ३५० टनांवर आले आहे.
निर्यातीवर परिणाम
जळगावातून दररोज अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया यासह वेगवेगळ्या देशांत निर्यात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे विविध देशांमधील मालाच्या आयात-निर्यातीवर परिणाम होऊ लागला. त्यात गेल्या महिन्यापासून ब्रेक द चेनमुळे अधिकच परिणाम जाणवत आहे.
जळगावातील दालमिल ६५
नेहमी उत्पादन ७०० टन
सध्याचे उत्पादन ३५० टन
कामगार - १०००
----------
निर्बंध काळात दालमिलचे उत्पादन ५० टक्क्यांवर आले आहे. कच्च्या मालाची चणचण असण्यासह उत्पादित माल विक्रीवर परिणाम झाला आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.