जळगाव, दि. 21 - पावसामुळे शहरातील कन्नड घाटातील रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्यान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. चाळीसगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणा-या औट्रम (कन्नड) घाटात रविवारी (21 ऑगस्ट) झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हसोबा मंदिराच्या अलिकडे रस्ता खचला आहे. यामुळे घाटातील वाहतूक रविवारी राञी 8 वाजल्यापासून वाहतुकीसाठी थांबवण्यात आला आहे.
रविवारी चाळीसगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. एकाच दिवशी ५८ मिमि पाऊस झाला. दुपारीदेखील पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसानं हा रस्ता खचल्याचे लक्षात आल्यानंतर चाळीसगाव वाहतूक शाखेने पाहणी करुन वाहतूक वेळीच थांबवली, अशी माहिती शाखेचे प्रमुख सुरेश शिरसाठ यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्याचा भाग खचला तेथे खाली खोल दरी आहे.नागद व नांदगावमार्गे वाहतूक वळविलीदरम्यान कन्नड घाटातील वाहतूक आता नागदमार्गे म्हैसमाळ घाटातून वाहने औरंगाबादकडे जात आहेत. औरंगाबादकडून येणारी वाहने ही नांदगाव व नागद मार्गाने चाळीसगाव शहराकडे वळवण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेचा अहवाल 'हाय वे अथॉरिटी' ला देण्यात आला असून पुढील कारवाई लवकरच होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी संध्याकाळी चाळीसगाव-कन्नड असा प्रवास करताना दरड कोसळल्याची व रस्ता खचल्याची माहिती कन्नड येथील शिक्षक राजेंद्र सोनार यांनी घाटातील पोलिसांनी दिली होती. म्हसोबा मंदिरापासून चाळीसगावकडे जाताना १०० ते १५० मीटर अंतरावर २५ फुट रुंद व ४० फुट लांब रस्ता खचल्याने रहदारीस धोका निर्माण झाला आहे. यामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
पोलिसांनी खबरदारी घेत हा रस्ता रविवार रात्री 8 वाजल्यापासूनच वाहतुकीस बंद केला आहे. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून गवताळा-नागद- चाळीसगाव अशी पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु; हा मार्ग केवळ छोट्या वाहनांसाठी असल्याने दोन्ही बाजूने मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.