मतीन शेख
मुक्ताईनगर : ‘तापी’, ‘पूर्णा’ खोऱ्याचे वैभव असलेल्या हतनूर धरणात दिवसेंदिवस गाळाचे प्रमाण वाढत असल्याने धरणात जलसाठा साठवण क्षमता झपाट्याने खालावत आहे. जलसाठ्याची धोक्याची पातळी गाठण्याअगोदर धरणातून पाणी सोडणे क्रमप्राप्त असल्याने गेल्या दीड महिन्यात सध्याच्या हतनूर धरण साठवण क्षमतेनुसार अर्ध्या पावसाळ्यापूर्वीच सुमारे दीड धरण भरेल इतके पाणी हतनूर धरणातून सोडण्यात आले आहे. गाळामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाल्याने हक्काचे पाणी समुद्रात सोडावे लागत आहे.
गाळ ही समस्या सुटता सुटेना
तापी पूर्णा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची जलसंजीवनी असलेल्या हतनूर धरणात गाळ ही समस्या सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. मेरी या संस्थेने केलेल्या २०१८ सर्वेक्षणाचा अहवालानुसार ५४ टक्के गाळ साचला आहे. यामुळे ३८८ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या या धरणाला गाळाची नजर लागल्याने धरणात क्षमतेपेक्षा निम्मे जलसाठा इतकी मर्यादा आली आहे. या अनुषंगाने विचार केला तर ३८८ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या या धरणात साधारणतः १७५ दशलक्ष घनमीटर इतकेच पाणी साठविण्याची क्षमता आज रोजी आहे.
‘मेरी’चा अहवाल स्वीकारला जावा
प्रशासन स्तरावर ‘मेरी’चा अहवाल स्वीकारला गेला नसल्याची प्राथमिक माहिती असली तरी गाळ ही समस्या सुटली नाही. धरणाची साठवण क्षमता कमी झाल्याने धोक्याची पातळी गाठण्याअगोदर धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. परिणामी गेल्या दीड महिन्यात तब्बल २८९ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणातून सोडलेले पाणी दीड महिन्यातील हा जलसाठा आजच्या हतनूर धरण क्षमतेच्या दीड पट म्हणावा लागेल.
‘हतनूर’चे पाणलोट क्षेत्र मोठे
सध्या पावसाळ्यात पाऊस कमी असला तरी हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे. धरणात पावसाळ्यात पाण्याची आवक दमदार असते. १ जून ते २० जुलै दरम्यान धरणातून २८९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडले गेले आहे. धरणात जलसाठा ठेवण्यासाठी नदी पात्रापासून २१४ मीटर अंतरापर्यंतच जलपातळी कायम ठेवावी लागते, म्हणून ही पातळी २१३ मीटरपर्यंत पोहोचताच सतर्कतेचा इशारा दिला जातो. यापेक्षा अधिक जलसाठा झाल्यास धरणाच्या पूर क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच हतनूर धरण हे तापी-पूर्णावरील मान्सूनोत्तर पावसावर अवलंबून असलेले धरण आहे. यामुळे १५ ऑगस्टनंतर धरणाची जलपातळी वाढवून १५ ऑक्टोबरपर्यंत धरणात १०० टक्के जलसाठा करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने करीत असते.
हतनूर धरणात २१४ मीटरपर्यंत पाण्याची पातळी ठेवता येते. ही पातळी २१३ मीटरपर्यंत आल्यानंतर सतर्कता जाहीर केली जाते. धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने पाण्याची आवक जोरदार असते. परंतु साठवण मर्यादा असल्याने पाण्याचा विसर्ग करावाच लागतो. गाळामुळे धरणाची साठवण क्षमता कमी होत आहे.
-एन. पी. महाजन, शाखा अभियंता, हतनूर