लोकमत आॅनलाईन
जळगाव, दि.२२ : आव्हाणे गावातील सर्वांची लाडकी..सर्व जण तिला प्रेमाने दिदी म्हणायचे..मात्र या दिदीसाठी पाडवापहाट काळरात्र ठरली. पणतीमुळे कपड्याने पेट घेत जखमी झालेल्या दिदी तथा पल्लवी सोमनाथ चौधरी (वय-१०, रा.आव्हाणे) हिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला.पल्लवीचा मृत्यू सर्व ग्रामस्थांना चटका लावून गेला़ पणतीने घात केल्याने भाऊबिजेला गावात एकही पणती पेटली नाही.
आव्हाणे येथील सोमनाथ श्रीधर चौधरी हे शेती करतात़ पत्नी सीमा,मुली पल्लवी व कांचन असा त्यांचा परिवार आहे़ पाडवापहाटच्या दिवशी गावात शेतात लक्ष्मी घेवून जाण्याची परंपरा आहे़ त्यानुसार सोमनाथ चौधरी हे शुक्रवारी सकाळी लवकर उठून शेतात लक्ष्मी घेवून गेले होते़ तर पत्नी सीमा ही घरकामात व्यस्त होती़ आई-वडील लवकर उठल्याने पल्लवीही सकाळी लवकर उठली होती़ आंघोळ करुन पल्लवी अंगणातील पणतीजवळ बसली होती़ खेळताना पणतीची आस लागून केव्हाच तिच्या अंगावरील फ्रॉकने पेटला घेतला़ गोंधळलेल्या अवस्थेत गल्लीत यानंतर पुन्हा घरात पळाली़ तिला पाहताच आईने घरातील हंड्यातील पाणी तिच्या अंगावर टाकले. माहिती मिळताच तिच्या वडीलांसह ग्रामस्थांनी घराकडे धाव घेत तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले़ २० टक्के जळाल्याने तिच्यावर उपचार सुरु होते़ तब्बल २४ तासानंतर शनिवारी रात्री ८़३० वाजता तिची प्राणज्योत मालवली़
आमची दिदी कुठे गेली..
पल्लवीच्या मृत्यूमुळे वडील सोमनाथ चौधरी व आई सीमा यांनी प्रचंड आक्रोश केला़ आमची दिदी कुठे गेली..मला भाऊबिजेला कोण ओवाळणार..क़ांचनला कोण खेळविणाऱ..असे म्हणणाºया आई-वडीलांचा आक्रोश बघून ग्रामस्थांसह तरूणांनाही अश्रू अनावर झाले. घटनेने दिवाळीसारख्या सणात गावात प्रचंड निरव शांतता पसरली.कुणीच पणतीही पेटविली नाही, अन् फटाकेही फोडले नाही.
आता ‘स्वाध्याय’ची प्रार्थना कोण म्हणणार?
पल्लवी जि. प.च्या शाळेत तिसºया वर्गात होती. हुशार,प्रत्येकाचे काम ऐकणे, देवी, गणपती उत्सवात तयारी करणे यामुळे ती घरच्यांचीच नाही तर ग्रामस्थ, तरुणांचीही लाडकी दिदी होती. नेहमी संध्याकाळी न चुकता ती मुलांना गोळा करुन स्वाध्यायला घेवून जायची़ तोंडपाठ असल्याने पल्लवीच प्रार्थना म्हणायची़ आता तिच्यानंतर स्वाध्यायची प्रार्थना कोण म्हणणार अशा एक ना अनेक आठवणींनी ग्रामस्थ हळहळत आहेत.
सोशल मीडियावर दिदीला श्रध्दांजली
तिच्यासोबत खेळताना, बोलताना कधी वेळ निघून जायचा हे तरुणांनाही कळायचे नाही़ या लाडक्या दिदीला तरुणांनी अनोखी श्रध्दांजली दिली़ शनिवारी रात्री पासून प्रत्येक तरुणाच्या व्हॉटस् अॅप च्या डिपीवर तर काहींच्या फेसबुकच्या प्रोपाईलवर पल्लवीचे आठवणीत फोटो लागले होते़ काळाच्या पडद्याआड झालेली दिदी आपल्यात नसली तरी ती नेहमी प्रत्येकाच्या हृदयात राहिल, या शब्दात प्रत्येकाने तिला सोशल मीडियावर श्रध्दांजली अर्पण केली.सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी सकाळी आव्हाणे गाव गाठत पल्लवीच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले़ यावेळी त्यांच्यासोबत अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी व कार्यकर्तेही उपस्थित होते.