जळगाव : विषारी सापाने दंश केल्यानंतरही कावेरी राजेंद्र तिरमले (वय 10 वर्ष) ही इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी बुधवारी 11.30 वाजता शाळेत जायला निघाली. अर्ध्या वाटेत गेल्यानंतर चक्कर आल्याने कावेरी माघारी फिरली. कुटुंबीयांनी घरातच मिरची खाऊ घालण्याचा प्रयोग केला. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी ३.५० वाजता कावेरीचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेने सुप्रीम कॉलनीत व शारदा माध्यमिक विद्यालयात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीत झिपरु अण्णा शाळेजवळ राजेंद्र तिरमले हे पत्नी भारती, मुलगी कल्याणी, कावेरी, मुलगा किरण, वडील-आई यांच्यासह पत्र्याच्या खोलीत वास्तव्याला आहेत. पती-पत्नी मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. कावेरी ही सुप्रीम कॉलनीतील शारदा माध्यमिक विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दुपारी १२ ते ५ अशी शाळेची वेळ असल्याने नेहमीप्रमाणे कावेरी 11.30 वाजता शाळेत जाण्यासाठी तयार झाली. घराच्या बाहेर असताना कंपाऊंडमध्ये तिचा ओढणी अडकली, ती काढत असताना तिला विषारी सापाने चावा घेतला, मात्र सापानेच चावा घेतला हे तिच्या लक्षात आले नाही.
तार किंवा काही तरी अन्य किड्याने चावा घेतला असावा म्हणून तिने याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर ती सरळ शाळेकडे निघाली. अर्ध्या रस्त्यातच तिला चक्कर आली, त्यामुळे कावेरी माघारी फिरुन घरी गेली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्यालयातील शिक्षक शिवाजी पाटील व अन्य शिक्षकांनी तिच्या घरी व रुग्णालयात धाव घेतली होती. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर कावेरी हिला चक्कर यायला लागले. त्यामुळे ती तशीच माघारी घरी गेली. कुटुंबाला चक्कर येत असल्याची माहिती दिली. तसेच ओढणी काढताना हाताच्या बोटांना कशाने तरी चावा घेतला असे तिने सांगितले. बोटाचे ठसे पाहिले असता सर्पदंश झाल्यासारखे वाटले, त्यामुळे घरातील लोकांनी तिला मिरची खाऊ घातली. मिरची प्रयोगात प्रकृती अधिकच खालावल्याने तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर १२.५० वाजता तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. उपचार सुरु असताना दुपारी २.५० वाजता तिची प्राणज्योत मालवली.