ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.19 : जिल्हाभरात 7 ते 11 जून यादरम्यान आलेल्या कमी अधिक पावसात कडधान्य, तृणधान्य व गळीत धान्याची पेरणी केलेल्या जवळपास 60 हजार हेक्टवरील पिके (अंकुर) पावसाअभावी जळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रावर दुबार पेरणी निश्चित मानली जात असून, शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडल्याची स्थिती आहे.
जिल्हाभरात एक लाख 80 हजार हेक्टरवर पेरणी झाली. त्यात एकटय़ा कापसाचे क्षेत्र एक लाख 42 हजार हेक्टरवर आहे. उर्वरित म्हणजेच जवळपास 38 हजार हेक्टरवर ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिके आहेत. त्यात मक्याची सर्वाधिक 12 हजार हेक्टरवर पेरणी झाली. त्यापाठोपाठ सोयाबीनची नऊ हजार हेक्टवर पेरणी झाली आहे.
पूर्वहंगामी कापूस वगळता इतर पिके धोक्यात
एक लाख 42 हजार हेक्टरपैकी 60 हजार हेक्टवरील पिके ही कोरडवाहू आहेत. ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. उर्वरित म्हणजेच 82 हजार हेक्टवर पूर्वहंगामी (बागायती) कापूस आहे. या कापसाचे सिंचन होत असल्याने त्याला धोका नाही. पण 60 हजार हेक्टवरील पिके काही भागांचा अपवाद वगळता पूर्णत: धोक्यात आली आहेत. जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ आणि यावल तालुक्याच्या जळगावनजीकचा भाग या क्षेत्रात पिकांची अवस्था नाजूक बनली आहे.