ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.9- जगताना दिव्यांग बांधवांना येणा:या अडचणी दूर करण्यासह त्यांना आधार मिळावा, मदत व्हावी यासाठी उपयुक्त अशी अडीच कोटींची उपकरणे, साहित्य केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयातर्फे पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी दिव्यांग बांधवांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. आपल्याला जगण्यासाठी आधार मिळाल्याने, जीवन काहीसे सुकर होईल म्हणून दिव्यांग बांधव हरखले.
सागर पार्क मैदानावर सकाळी हा कार्यक्रम झाला. त्यात दिव्यांग बांधवांना काठी, तीनचाकी सायकल, कर्णयंत्र आदींचे वाटप झाले. त्यासाठी एक कोटी रुपये केंद्र सरकार व दीड कोटी रुपये पंचायती आखाडा, (त्र्यंबकेश्वर) यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आले.
व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंसह जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, स्मिता वाघ, उन्मेष पाटील, जि.प.अध्यक्षा उज्जवला पाटील, महापौर नितीन लढ्ढा, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.तील सभापती प्रभाकर सोनवणे, समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड, अपंग संघटनेच्या मीनाक्षी निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
2301 लाभार्थीना चार हजार विविध उपकरणे, साहित्याचे मान्यवरांच्याहस्ते वितरण झाले. त्यात धुळे येथील अंजली बाविस्कर यांनी 12 दिव्यांगांसाठी तिचाकी मोटारसायकली उपलब्ध करून दिल्या. बॅटरीवर चालणा:या सायकलींचे वितरण झाले.
पाळधी जि.प.शाळेला एक कोटींचा धनादेश
एम्पती फाउंडेशन (मुंबई) यांच्यातर्फे पाळधी ता.जामनेर येथील जि.प.शाळेला एक कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. सरपंच कमलाकर पाटील यांनी धनादेश स्वीकारला. या निधीतून शाळा आधुनिक व डिजीटल केली जाणार आहे.