मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाचा मार्ग बदलला, अखेर जळगावात लँडींग
By अमित महाबळ | Published: July 10, 2023 07:40 PM2023-07-10T19:40:52+5:302023-07-10T19:52:53+5:30
धुळे येथे सोमवारी (दि.१०) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून धुळ्याला जाणारे विमान खराब हवामानामुळे अनपेक्षितपणे जळगावच्या विमानतळावर उतरले आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी अन् पोलिस अधीक्षक दोघेही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे जळगावात नव्हते. त्यांच्या गैरहजेरीत बाकीच्यांनी आघाडी सांभाळली, दहा मिनिटांत संपूर्ण यंत्रणा उभी केली. राज्याचे दोन्ही प्रमुख जळगावचे झटपट नियोजन पाहून खूश झाले आणि कौतुक करत धुळ्याकडे मार्गस्थ झाले.
धुळे येथे सोमवारी (दि.१०) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून विमानाने धुळ्याकडे निघाले. मात्र, अचानक पाऊस आणि खराब हवानामुळे त्यांचे विमान धुळे येथील विमानतळावर उतरणे अशक्य झाले. जवळचे सर्व सज्जता असलेले विमानतळ जळगावचे होते. विमानाचा मार्ग बदलला. जळगावला उतरायचे आणि तेथून रस्तामार्गे धुळ्याला जायचे नियोजन तयार झाले. जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना अलर्ट गेला. पण दोघेही पूर्वनियोजनामुळे बाहेरगावी होते.
अपर जिल्हाधिकाऱ्यांनी हातात घेतली सूत्रे
जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत आघाडी सांभाळणारे अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना २:१८ वाजता साहेबांचा फोन आला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जळगावला येताहेत. पुढील व्यवस्था करा. राजशिष्टाचार सांभाळणे, वाहनांचा ताफा उभा करणे, जळगाव ते धुळ्याच्या हद्दीपर्यंत रस्त्याने पोलिस बंदोबस्त लावणे, सोबत आलेल्यांसाठी बॅकअप टीम देणे हे सगळे केवळ १० मिनिटात उभे करायचे होते. महसूल, पोलिस, सिव्हील, आरटीओ यांच्या समन्वयातून तेही साधले गेले.
अन् वाहनांचा ताफा सज्ज
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हटल्यावर त्यांच्यासाठी राज्य प्रमुखाच्या प्रतिष्ठेला साजेशी वाहने हवी होती. वाहनांची कागदपत्रेही परिपूर्ण हवी होती. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व अनिल पाटील हे तीन मंत्री जिल्ह्यात असल्याने प्रशासनाची काही वाहने त्यांच्याकडे राखीव आहेत तरीही प्रशासनाने अतिशय कमी वेळात जुळवाजुळव केली. पायलट कार, रुग्णवाहिका यांच्यासह नऊ वाहनांचा ताफा विमानतळावर सज्ज झाला. मागून अधिकाऱ्यांची वाहने होती.
अडीच वाजता लँडिंग
विमान दुपारी अडीच वाजता जळगाव विमानातळावर उतरविण्यात आले. विमानातळाच्या प्रतीक्षालयात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दहा ते पंधरा मिनीटे थांबले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. जळगाव येथेही पाऊस सुरू होता. या पावासात त्यांचा ताफा धुळ्याकडे रवाना झाला. ताफा सुखरूप पोहोचल्याचा वायरलेस आल्यावर प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.