जळगाव : गेल्या वर्षी जळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यानंतर, यंदा १ मे महाराष्ट्र दिनापासून हेलीकॉप्टर प्रशिक्षण केंद्रही सुरू होणार होते. त्यासाठी जेट सर्व्ह एव्हिएशन व विमानतळ प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, डीजीसीए कडून अद्याप परवानगी न मिळाल्याने जळगाव विमानतळावरील हेलीकॉप्टर प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकला आहे.
केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाद्वारे भारतात आणि इतर देशांमध्ये असलेली वैमानिकांची गरज आणि मागणी लक्षात घेता भारतातील सर्व सुविधा असलेल्या विमानतळांवर `फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी `सुरू करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात मध्यप्रदेशातील खजुराहो या ठिकाणी हेलीकॉप्टर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रतील एकमेव मंजुर केलेले जळगावचे प्रशिक्षण केंद्रही येत्या १ मे पासून सुरू होण्याची शक्यता होती. हेलिकॉप्टर प्रशिक्षासाठी जळगाव विमान विमानतळांवर स्वत्रंत इमारत बांधून, दिल्ली येथे विद्यार्थीची प्रवेश प्रकियाही अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी डीजीसीएने अद्याप परवानगी दिलेली नाही.
तर विद्यार्थांना जळगावलाही प्रवेश मिळणार..
हरियाणा राज्यातील गुरूग्राम येथील जेट सर्व्ह एव्हिएशन या कंपनीतर्फे जळगावला हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत आहे. संस्थेतर्फे या प्रशिक्षण केंद्रासाठी सध्या दिल्ली येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, खानदेशातील कुठल्याही विद्यार्थाला या हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असेल, त्यांना जळगावलाही प्रवेश घेता येणार आहे. मात्र, दिल्ली येथे फक्त संस्थे मार्फत करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपसणीसाठी जावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव विमानतळावर हेलीकॉप्टर प्रशिक्षण केंद्र १ मे पासून सुरू करण्याचे आमचे नियोजन होते. त्या दृष्टीने तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र,डीजीसीए कडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. लवकर परवानगी मिळण्या साठी आमचे वरिष्ठ अधिकारी पाठपुरावा करत आहेत. परवानगी मिळाल्यानंतर लवकरच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल.-विवेक यादव, ऑपरेशन व्यवस्थापक, जेट सर्व्ह एव्हिएशन, जळगाव विमानतळ.