अमित महाबळ, जळगाव : शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांकडे पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मात्र, ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नव्हते, त्यांची अडचण झाली होती. त्यांच्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सुटीच्या दिवशी काम करून सुमारे २५० पदवी प्रमाणपत्रांचे तातडीने वाटप केले. त्यामुळे इच्छुकांचा शिक्षक भरतीचा अडलेला मार्ग खुला झाला आहे.
राज्यात २०१७ पासून सुमारे ६० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे अनेक पात्रताधारक उमेदवार नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १ सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याची मुदत सुरूवातीला १५ सप्टेंबरपर्यंत होती. ती नंतर वाढवून दि. २२ सप्टेंबर करण्यात आली आहे. नोंदणी करताना उमेदवारांना गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्राच्या प्रती पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत. मात्र, काही जणांकडे पदवी प्रमाणपत्राची प्रत नसल्याने त्यांची अडचण झाली होती. या संदर्भात विद्यापीठ विकास मंचने विद्यापीठाला निवेदन देऊन नियमानुसार शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीसाठी तातडीने पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती. अर्ज करताच प्रमाणपत्रे
विद्यार्थ्यांची निकड आणि वेळेचा अभाव लक्षात घेऊन परीक्षा विभागाने शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही कामकाज केले आणि २५० पदवी प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. ही प्रमाणपत्रे पीडीएफ स्वरूपात आहेत. अर्ज करताच आठवडाभरात प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.