जळगाव - जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वच सरकारी कार्यालयांमधील कामकाज ठप्प आहे. जिल्हा कोषागार कार्यालयात गेल्या सात दिवसांत विविध विभागांची ८०० बिले जमा झाली आहेत पण कर्मचाऱ्यांअभावी त्यांची अदायगी करणे शक्य झालेले नाही. संप आणखी लांबल्यास वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन या दोन्हींचा प्रश्न निर्माण होणार आहे.
२९ हजार ६०० पेन्शनर जळगाव जिल्ह्यात आहेत. त्यांचे पेन्शनचे काम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दोन ते तीन दिवसांत केले जाते. त्याशिवाय फॅमिली पेन्शन, पेन्शन लागू करणे, लाभार्थीच्या मृत्यू पश्चात त्याच्या पेन्शनमधील फरकाची रक्कम वारसांना देणे आदी कामे महिनाभर सुरू असतात. यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात १० टेबल आहेत. पण संपामुळे कर्मचारी नाहीत. संप लांबल्यास पेन्शनला उशीर होणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पातील विभागनिहाय तरतुदी ३१ मार्च २०२३ अखेर खर्ची घालण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
७७ पैकी चार जण कामावर
जिल्ह्यात एक मुख्य कोषागार कार्यालय आणि १४ उपकोषागार कार्यालये आहेत. सर्व मिळून ७७ कर्मचारी असून, त्यापैकी चार जण कामावर आहेत. ते वर्ग दोनचे आहेत. कंत्राटी कर्मचारी नियुक्त नाहीत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कोषागार कार्यालय रात्री ८ वाजेपर्यंत खुली असतात, तर शेवटच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत काम सुरू असते. या संबंधीचे निर्देश आले होते पण त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे.