डोक्याला ताप : दैनंदिन व्यवहारात हमरीतुमरीचे प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : नोटाबंदीनंतर अस्तित्वात आलेल्या १०, २० आणि ५० रुपयांच्या फाटक्या-तुटक्या, चिकटविलेल्या जीर्ण नोटांचा सध्या सगळीकडे सुळसुळाट झाला आहे. या नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कागदाचा दर्जा खूपच हलका असल्याने त्या व्यवहारात आल्यानंतर काही दिवसांतच वापरण्यायोग्य राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. व्यावसायिकांचीही त्यामुळे पंचाईत झाली आहे.
नव्याने अस्तित्वात आलेल्या १० ते ५० रुपयांच्या नोटा अल्पावधीतच जीर्ण होत
असल्याने ग्राहक व व्यावसायिकांना त्या सांभाळणे कठीण झाले आहे. कोणतीही
नोट फाटल्यावर तिला चिकटवून व्यवहारात आणताना, दोन्ही वर्गांना मोठी
तारेवरची कसरत करावी लागते. बऱ्याच वेळा फाटक्या, जीर्ण नोटांवरून बाजारपेठेत
ग्राहक व व्यापारी यांच्यात हमरीतुमरीच्या घटना घडताना दिसतात. बँकांमध्येही फाटक्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. फाटक्या नोटांमुळे कमी
उत्पन्न गटातील अनेकांचे आर्थिक व्यवहार रखडतात. जीर्ण नोटा चलनात
न आल्याने काहींना नुकसानही सोसावे लागते. स्टेट बँकेत जीर्ण नोटा
बदलण्याची सोय असली तरी तिथे सदासर्वदा राहत असलेली मोठी गर्दी लक्षात घेता
सामान्य नागरिक त्या भानगडीत शक्यतो कधी पडत नाहीत.
---------------
चिल्लर उदंड झाली...
जुन्या फाटक्या व चिकटविलेल्या जीर्ण नोटांना पर्याय म्हणून १, २, ५, १० रुपयांची
चिल्लर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वापरात आल्याचा प्रकारसुद्धा अलीकडे
वाढला आहे. अर्थात, त्यामुळे बाजारात चिल्लर उदंड झाली असून, ती खपविताना
ग्राहक व व्यावसायिकांच्या नाकीनऊ आले आहेत. चिल्लर घेऊन कोणी वस्तू
खरेदीसाठी आल्यानंतर त्यास व्यावसायिकांकडून सपशेल नकार दिला जातो. उलटहाती दुकानदारांकडूनही कोणीच चिल्लर घेत नाही. अशा या विपरीत परिस्थितीत ग्राहक व दुकानदार यांची दोघांची कोंडी होताना दिसते.
-----------------
फोटो-
कागदाचा दर्जा चांगला नसल्याने अल्पावधीतच जीर्ण होण्याच्या मार्गावर येऊन
ठेपलेल्या अशा बऱ्याच नोटांचा सध्या सगळीकडे सुळसुळाट झाला आहे. (छाया : जितेंद्र पाटील)