जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. टमाट्याच्या भावात ३०० रुपये प्रति क्विंटलने घट होऊन लाल टमाटे १,२०० रुपये प्रति क्विंटलवर आले. सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भाव कमी झाले. हिवाळ्याच्या सुरुवातीपासून टमाट्याचे भाव कमी होत असतात.
मात्र, मध्यंतरी टमाट्याची आवक कमी होऊन गेल्या आठवड्यात केवळ २२ क्विंटल टमाट्याची आवक झाल्याने भाव वाढ होऊन ते १,५०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते. मात्र, या आठवड्यात टमाट्याचे भाव थेट ३०० रुपये प्रति क्विंटलने कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात १,७५० रुपयांवरून १,४५० रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. भेंडीचे भाव ५०० रुपये प्रति क्विंटलने कमी होऊन ते १,५००, कारल्याचे भाव ३०० रुपये प्रति क्विंटलने कमी होऊन ते १,५०० रुपयांवर आले आहेत.