जळगाव : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे १ लाख ५७ हजार ६९० विद्यार्थ्यांना यंदा गणवेशाचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी शासनाने ४ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना दोनऐवजी एकच गणवेश दिला जाणार आहे.
दरवर्षी सर्व शिक्षा अभियान अर्थात समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत दिले जाते. विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात; मात्र यंदा दोनऐवजी एकच गणवेश दिला जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. दुसरीकडे अद्याप पहिली ते आठवीच्या शाळा उघडलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेची शिक्षण विभागाला प्रतीक्षा आहे. तसेच गणवेशासाठीचा निधी शासनाकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झालेला आहे
४ कोटी ७३ लाखांचा निधी मिळाला...
जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेशाचे वाटप केले जाते. त्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जातो. यंदा शासनाने ४ कोटी ७३ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झालेला आहे. दरवर्षी गणवेशसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
निधी होणार शाळांच्या खात्यावर वर्ग
शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचे वाटप थेट शाळांना केले जाणार आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात १८२८ शाळांच्या खात्यावर ४ कोटी ७३ लाख रुपये वर्ग केले जातील. नंतर शाळेकडून गणवेश देण्याबाबतची कार्यवाही केली जाईल; मात्र शाळा उघडल्या नसल्यामुळे मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.
या वर्षीसुध्दा विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केले जाईल; परंतु कोरोनामुळे विद्यार्थ्यांना दोनऐवजी एकच गणवेश देण्यात येईल. गणवेशासाठीचा निधी शासनाकडून शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. पुढील आठवड्यात शाळांच्या खात्यावर ती रक्कम वर्ग केली जाणार आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे.
-भाऊसाहेब अकलाडे,
प्राथमिक शिक्षणाधिकारी