जळगाव : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील नववी ते बारावीची शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. जळगाव जिल्ह्यातीलही शाळा लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे आता वरिष्ठ महाविद्यालये केव्हा सुरू होणार हा उत्सुकतेचा भाग ठरला आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, सद्याची स्थिती पाहता, ऑफलाइन शिक्षण सुरू करण्यास हरकत नाही. त्यामुळे संपूर्ण सुविधांसह जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष महाविद्यालयांना सुरुवात व्हावी, असे प्राचार्य व प्राध्यापक संघटनांची भूमिका आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी गट हा १८ वर्षांवरील असल्यामुळे या विद्यार्थ्यांकडून संपूर्ण नियमांचे पालन होऊ शकते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व प्रात्यक्षिक पूर्ण व्हावेत, यासाठी आता वरिष्ठ महाविद्यालयांना परवानगी द्यावी, असे प्राचार्य, प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
संपूर्ण सुविधा असाव्यात...
कोरोनावरील लस ही लवकरच येणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, जानवोरीत आणखी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षात अर्थात जानेवारी महिन्यात वरिष्ठ महाविद्यालये सुरू करणे योग्य ठरेल, असे प्राचार्य फोरम संघटनेच्या सदस्यांनी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने सुविधा पुरविण्यास महाविद्यालांनी बांधील असणे गरजेचे आहे.
प्राध्यापक संघटनेला काय वाटते?
३१ डिसेंबपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतर महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नाही. प्रात्यक्षिकासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक असते. मात्र, महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी सज्ञान आहेत, त्यामुळे ते संपूर्ण नियमांचे पालक करतील व महाविद्यालयेसुद्धा. जानेवारीत शुभारंभ व्हावा, अशी अपेक्षा प्राध्यापक वर्गातून होत आहे.