सागर दुबे
जळगाव : आमच्या कंपनीला मेट्रोचे काम मिळाल्याचे सांगून दोन जणांनी व्यावसायिक राहुल जयप्रकाश बाविस्कर (रा.टेलिफोन नगर) यांच्या कंपनीच्या नावावर दोन डंपर घेवून त्याचे हप्ते आणि भाडे थकवून ६२ लाख ६२ हजार ८०८ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल बाविस्कर यांचा कन्स्ट्रक्शन आणि इंपोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांची धुळ्यातील एका व्यावसायिकाशी व्यापारातून ओळख झाली होती. त्या व्यक्तीच्या मुलाची मुंबई येथे एपीटी इन्फाटेक नावाची कंपनी असून त्या कंपनीला मेट्रोचे खणनचे काम मिळाले होते. त्यासाठी त्यांना डंपरची आवश्यकता होती. त्यामुळे बाप-लेकाने गोलाणी मार्केट येथे येवून राहुल बाविस्कर यांची भेट घेतली. बाविस्कर यांनी स्वत: कंपनीच्या नावावर दोन डंपर घेण्याचा प्रस्ताव दोघांनी दिला. तर आमची कंपनी डंपरचे हप्ते भरेल व तुम्हाला प्रत्येकी डंपरचे ३० हजार रूपये भाडे देवू असे सांगितले. त्यानंतर डंपर घेण्यासाठी बाप-लेकाने बाविस्कर यांच्याकडून १० लाख रूपयांची रक्कम घेतली. त्यानंतर करारनामा करून दोन डंपर खरेदी करण्यात आले.
स्वत:च्या फायद्यासाठी डंपरचा वापर...
दरम्यान, सुरूवातीच्या काळात बाप-लेकाने डंपरचे हप्ते भरले. त्यानंतर ते थकविण्यास सुरूवात केली. एवढेच नव्हे तर स्वत:च्या फायद्यासाठी डंपरचा वापर करून कामे करून घेतली. पण, प्रतिमहा ६० हजार रूपये भाडे दिले नाही. अनेकवेळा बाविस्कर यांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. अखेर करारनाम्याप्रमाणे व्यवहार न करता १० लाख रूपये डंपरसाठीचे, २१ लाख ६० हजार रूपयांचे थकीत भाडे आणि थकलेले बँकेचे हप्ते ३० लाख २ हजार ८०८ रूपये असे एकूण ६२ लाख ६२ हजार ८०८ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बाविस्कर यांनी त्या बाप-लेकाविरूध्द मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.