आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भावनिक, आर्थिक आधाराची गरज! : जळगाव शहरात ३८ जणांनी संपविले जीवन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना हे असे संकट जगावर आले की त्यामुळे अनेकांचे रोजगार हिरावला गेला. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. लाखोंच्या संख्येने देशात लोकांचा जीव गेला. एकट्या जळगाव जिल्ह्यात २५६६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे संकटात सापडेल्या अनेकांना नैराश्य आले. कुणाची रोजीरोटी गेली तर कोणाच्या कुटुंबात भांडणं झाली. यामुळे जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात २९१ जणांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे. यात सर्वाधिक संख्या तरुणांची आहे.
जळगाव शहर व तालुक्यात ३८ जणांनी आत्महत्या केली तर भुसावळ उपविभागात १७, फैजपूर ४६, मुक्ताईनगर २६, चाळीसगाव ४८, पाचोरा ४३, अमळनेर ४९ व चोपडा उपविभागात २४ अशा एकूण २९१ जणांनी चार महिन्यात आत्महत्या केल्याची नोंद पोलिसात आहे. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असली तरी प्रामुख्याने कोरोना हेच जास्त लोकांचे कारण ठरले आहे. कोणी राहत्या घरात गळफास घेतला, कोणी रेल्वेखाली उडी घेतली तर कोणी विष प्राशन केले. अशा लोकांचे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांना मानसिक व आर्थिक आधाराची गरज भासली आहे. अनेकांची लहान मुले पोरकी झाली आहेत. कोणत्या मुलाची आई गेली तर कोणाचे वडील गेले तर आई-वडील यांचा आधार असलेला तरुण मुलगा गेला. त्यामुळे मोठा आघात या कुटुंबावर आलेला आहे. आता लॉकडाऊन शिथिल झाले, त्यामुळे रोजगार, उद्योग-धंदे सुरू झाले. अनेकांची गाडी आता रुळावर येऊ लागली आहे.
हे दिवसही जातील...
कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. सारखं घरात बसून कुटुंबातही कटकटी सुरू झाल्या. त्यातून नैराश्य व तणावाचे वातावरण निर्माण झाले. याच कारणांनी अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. घरातील कर्ता व कमावत्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने घर व कुटुंब उघड्यावर आले. अशी कुटुंब तणाव संकटात आहेत. परंतु, येणारी व आलेली वेळ कधीच थांबत नाही. हे दिवसही निघून जातील, पुन्हा चांगले दिवस येतील, या आशेने कुटुंब जगायला शिकत आहेत. जवळचे नातेवाईक व मित्र अशावेळी मानसिक आधार देत आहेत.
कुटुंबाने काळजी घेण्याची गरज
आत्महत्या ही नैसर्गिक घटना नाही. त्यामुळे असा आघात आलेल्या कुटुंबाला सावरायला खूप वेळ लागतो. त्यात तरुण व्यक्तीने आत्महत्या केली असेल तर घरात खूपच वातावरण बिघडलेले असते, त्यांना सावरायला वेळ लागतो. मात्र जे आपल्या हातात नाही, नव्हते व जे घडून गेले, त्याला अपघात समजून विसरणे व स्वत: तसेच परिवाराची काळजी घेणे हेच अशा वेळी महत्त्वाचे असते.
२०१९ मध्ये शहरात झालेल्या आत्महत्या : १११
२०२० मध्ये शहरात झालेल्या आत्महत्या : १३६
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यातील आत्महत्या : ३८
कोणत्या वयोगटातील किती आत्महत्या
२५ वर्षापेक्षा कमी : ०९
२६ ते ४० वयोगट : १८
४१ ते ६० वयोगट : ०९
६१ पेक्षा जास्त : ०२
काय म्हणतात मानसोपचार तज्ज्ञ
सध्याच्या परिस्थितीत कोविडमुळे कामे बंद पडले. लॉकडाऊनमध्ये मित्रांशी संवाद कमी झाला, एकाच जागी राहणे, यामुळे नैराश्यात वाढले आहे. त्यातच घरगुती हिंसाचारही या काळात वाढले आहेत, शिवाय व्यसनाधीनता वाढल्याने अशा बाबींना तरुण लवकर बळी पडत आहेत. त्यामुळे या येणाऱ्या नैराश्यात काही मनाविरुद्ध झाल्यास ते आत्महत्येचे पावले उचलतात. यासाठी संवाद वाढविणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. दिलीप महाजन, मानसोपचार तज्ज्ञ
लॉकडाऊनमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची वेगवेगळी कारणे आहेत. यात असुरक्षित वातावरण हे एक कारण आहे. कारण कोणत्याच गोष्टीची कोणाकडे उत्तरे नव्हती. पुढे काय होणार हे माहीत नव्हते. सर्वत्र नकारात्मकता होती. शिवाय अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. लॉकडाऊनच्या काळात संवाद घटला, विचारवंत लोकही कोरोना व्यतिरिक्त काहीच बोलत नव्हते. ही कारणं आहेत. सुसंवादाच्या माध्यमातून नैराश्य कमी करता येते. त्यासाठी एकमेकांमध्ये संवाद हवा
- डॉ. पंकज संघवी, मानसोपचार तज्ज्ञ
--