शैक्षणिक उपक्रम : ऑनलाईन अभ्यासक्रमातूनही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतेय चिकाटी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे शासनातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी (डिजिटल होम असेसमेंट योजना) अर्थात व्हाॅट्स ॲपच्या माध्यमातून ‘स्वाध्याय’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातील ४७ टक्के विद्यार्थ्यांनी व्हाॅट्स ॲपच्या माध्यमातून स्वाध्याय केला आहे. या ऑनलाईन उपक्रमातील अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
यंदा प्रथमच कोरोनामुळे सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाला सामोरे जावे लागले. यामध्ये विशेषतः पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने व्हाॅट्स ॲपच्या माध्यमातून (डिजिटल होम असेसमेंट योजना) हा स्वाध्याय उपक्रम राबविला. या उपक्रमात ६ लाख २१ हजार ९४६ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९४ हजार विद्यार्थ्यांनी स्वाध्यायासाठी नोंदणी केली होती; तर यात २ लाख ९२ हजार १८ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविला. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर विविध विषयांवर अभ्यास घेऊन प्रश्नोत्तरे विचारण्यात आली. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड न पडता त्यांचा नियमित सराव होत आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना हे अध्ययन करताना अवघड वाटले. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या स्वाध्यायामध्ये अधिकच चिकाटी निर्माण होत आहे.
इन्फो :
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी
६ लाख २१ हजार ९४६
स्वाध्यायासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी - २ लाख ९४ हजार ४५
स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी - २ लाख ९२ हजार १८
इन्फो :
मराठी नोंदणी १९४३८८
सोडविणारे १९३४१९
इंग्रजी नोंदणी ५९३०३
सोडविणारे ५८४३०
उर्दू माध्यम नोंदणी ४०३५४
सोडविणारे ४०१६९
इन्फो : स्वाध्याय उपक्रमात मराठी व गणित विषयांवर १० गुण असणारे प्रश्न विचारलेले असतात. त्यात उत्तरासाठी ४ पर्याय दिलेले असल्याने, त्यातून १ योग्य पर्याय क्रमांक टाइप करावा लागतो. मला हा उपक्रम खूप आवडतो. दर शनिवारी नवीन पेपर येतो. तो मी खूप आवडीने सोडविते. आता शाळा सुरू नसली, तरी यामुळे अभ्यास होतो.
विदिता तायडे, विद्यार्थिनी
स्वाध्याय मोबाईलवर सोडवायला मला खूप आनंद वाटतो. ‘स्वाध्याय’मध्ये अतिशय सोप्या प्रश्नांची मालिका असते. त्यामुळे आमचा अभ्यासदेखील छान होतो. मी खूप मन लावून स्वाध्याय सोडविते; पण स्वाध्याय आठवड्यातून दोनदा असावा असे वाटते; कारण शाळा बंद असल्याने, स्वाध्याय सोडवायला खूप वेळ असतो.
हर्षाली पाटील, विद्यार्थिनी.
इन्फो :
स्वाध्याय उपक्रमात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. शिक्षक विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारे अध्ययन करून घेत आहेत. तसेच या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी आम्ही पालकांनाही आवाहन करीत आहोत.
- बी. जे. पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जळगाव