आॅनलाईन लोकमतजामनेर,दि.१७ : आपल्या विविध मागण्यांसाठी एस.टी.कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जामनेर आगारातील ६७२ फेऱ्या रद्द होऊन साडे सहा लाखांचे उत्पन्न बुडाले. संपकाळात कर्मचाऱ्यांनी आगारात भजन करीत क्रिकेटचा आनंद लुटला.एस.टी.कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारल्यामुळे जामनेर आगारातून सकाळी एकही बस बाहेर पडली नाही. रावेर येथून औरंगाबादकडे जाणारी बस स्थानकात आली. कर्मचाऱ्यांनी ही बस अडवित तिकिटांचे पैसे परत करीत प्रवाशांना खाली उतरविले. एस.टी.ची सेवा बंद असली तरी खाजगी ट्रॅव्हल व कालीपिलीद्वारे प्रवासी वाहतूक मात्र जोरात होती. संपाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांनी तालुक्याच्या ठिकाणी येणे टाळले. जामनेर-जळगाव व जामनेर-भुसावळ या मार्गावरील एस.टी.सेवा बंद असली तरी प्रवाशांनी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घेतला.संपकाळात एस.टी.च्या चालक व वाहकांनी जामनेर आगारात भजन सुरु केले. उपस्थित कर्मचारी व प्रवाशांनी भजन ऐकण्यासाठी गर्दी केली होती. काही कर्मचाऱ्यांनी क्रिकेट, कॅरम या खेळांमध्ये सहभाग घेतला. जामनेर विभागात १०० टक्के संप यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला.संपात कामगार संघटनेसह, इंटक, मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एस.टी.कामगार संघटना, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना व संघर्ष ग्रुपचे कर्मचारी सहभागी झाले.
जामनेर आगारातून दररोज ६७२ फेºया होतात. ८४ बसेस व ४४१ कर्मचारी आहेत.आगाराचे सरासरी उत्पन्न एका दिवसाला साडेसहा लाख रुपये आहे.के.ए.धनराळे, आगारप्रमुख, जामनेर.