लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : दुश्मनाला दवाखान्यात दाखल केल्याच्या कारणावरून योगेश दिगंबर कोल्हे (रा.आसोदा) याच्यावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे (३२, रा. गणेशवाडी) याला पकडून तालुका पोलिस ठाण्यात चौकशी सुरू होती. मात्र, या चौकशी दरम्यान त्याने थेट पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर दोधू कोळी (४२) यांची कॉलर पकडून तुम्ही पोलिस माझे काहीच करू शकत नाही. मी आताच खुनाच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटलो आहे, मी तुम्हाला सर्वांना पाहून घेईल...अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आसोदा गावाजवळील हॉटेल आर्यासमोर शुक्रवारी पहाटे २ वाजता योगेश कोल्हे याच्यावर चेतन उर्फ चिंग्या याने गोळीबार केला होता. मात्र, गोळी चुकविल्यामुळे योगेशला कुठलीही दुखापत झाली नव्हती. या प्रकरणी पोलिसांनी चिंग्या याला वाकटूकी शिवारातून ताब्यात घेवून तालुका पोलिस ठाण्यात आणले होते. नंतर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील हे त्याची विचारपूस करीत होते. त्याठिकाणी चिंग्या याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस नाईक ज्ञानेश्वर कोळी हे उभे होते. अचानक चिंग्या याने कोळी यांची कॉलर पकडून तुम्ही पोलिस माझे काही करू शकत नाही. मी आताच खुनाच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटलो आहे, तुम्हाला सर्वांना बघून घेईल, मला आताच्या आता बाहेर सोडा असे जोरात बोलून धमकी दिली.
दरम्यान, कॉलर पकडल्यामुळे कोळी यांच्या शर्टाचे बटन आणि नेमप्लेट तुटली. त्यांनी कॉलर सोडविण्याचा प्रयत्न केला. यात दोघांमध्ये झटापट झाली. कोळी यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी चिंग्या याच्याविरूध्द तक्रार दिली. त्यानुसार शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"