जळगाव : दुर्वा ह्या गणपती बाप्पाला खूप आवडतात, त्यामुळे गणेश पूजेमध्ये, गणपतीला प्रसन्न करण्यासाठी २१ दुर्वांची जुडी बाप्पाच्या डोक्यावर वाहिली जाते. या दुर्वांमध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत. आयुर्वेदीक दृष्टीकोनातून महत्त्व व उपयोगिता आहे. गणपतींना वाहिलेल्या दुर्वांचा अपव्यय न करता, त्यांचा वापर आपण आपल्या स्वास्थ्यरक्षणासाठी केला तर गणेशजींचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने आपल्याला लाभेल.
‘दूर्वा’ही एक महत्त्वपूर्ण वनस्पती असून, ती अत्यंत गुणकारी, उपयुक्त, सर्व प्राणिमात्रांसाठी आरोग्यवर्धक व अनेक रोगांवर रामबाण असल्याचे सिद्ध झाले आहे. दुर्वांचे हिंदी नाव दुब तर संस्कृत नावे अमृता, अनंता, गौरी आहेत. मराठीत दूर्वा, हरळी म्हणतात. तिक्त रसात्मक आणि शीत वीर्य असल्यामुळे छर्दी (उलटी), विसर्प, तहान लागणे, पित्तशामक, आमातिसार, रक्तपित्त (कान व नाकातून रक्त येणे ) तसेच जखम भरून काढण्यास मदत करते.
या विकारात ठरते लाभकारीनाकातून उष्णतेने रक्त पडत असल्यास दूर्वांचा दोन थेंब रस नाकात टाकल्यास रक्त येणे बंद होते. उचकी, मुलांना जंत, गर्भवती स्त्रियांना उलट्या, चक्कर येत असल्यास, विंचू दंश, ताप आल्यावर तसेच तापाची तीव्रता वाढल्यास ती कमी करण्यासाठी, रक्ती मूळव्याध, अतिसार, आमांश, आमातिसार, रक्तार्श, छर्दी (उलटी), शरीरात पित्ताचा जोर वाढला असल्यास, पोटातील विकार, त्वचेचे विकार, बोटामध्ये होणाऱ्या चिखल्या, शिरशूल, रक्तप्रदर, रक्तस्त्राव, गर्भपात, योनी विकार, मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना, अनियमित मासिक चक्र, रक्तस्त्राव कमी किंवा अधिक होणे, मुत्रशर्करा (kidney stone) यामध्ये दुर्वांचा वापर लाभकारी आहे.
हरळीवरून चाला, दाह कमी होईलमधुमेही रुग्ण, त्वचाविकार रुग्ण, अंगात दाह असेल तर सकाळी व सायंकाळी दुर्वांवरून किंवा हरळीवरून ५ ते १० मिनिटे चालावे, अंगातील दाह कमी होतो.
डोळेदुखी कमी होतेआजकाल लॅपटॉप, संगणकावर काम केल्यामुळे डोळ्यावर ताण येऊन डोळे दुखतात. दुर्वांचा कुटून डोळ्यांच्या पापण्यांवर लेप लावल्यास डोळे दुखणे, तसेच डोळ्यातून पाणी येणे कमी होते. मुरुमांचे काळे डाग नाहिसे करण्यासाठीही दुर्वांचा वापर होतो.
दुर्वा ही बहुगुणी वनस्पती असून, आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. अनेक आजार दुर्वांच्या वापरामुळे बरे होतात. दुर्वांचा रस पोटात घ्यायचा असल्यास वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे, अशी माहिती जळगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील रसशास्त्र व भैषज्यकल्पना विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दिली.