ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 1 - साडेतीन मुहूतार्ंपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर जळगाव येथे सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होऊन करोडो रुपयांची उलाढाल झाली. तब्बल दीड वर्षानंतर मोठय़ा प्रमाणात सुवर्णखरेदी झाल्याने ‘सुवर्णनगरी’ गजबजून गेली होती. जळगावातील सोने देशभर प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. मात्र सराफ व्यवसायावर लावण्यात आलेला वाढीव कर, त्यामुळे पुकारलेला संप, नोटाबंदी, जीएसटी, आंतरराष्ट्रीय घडामोडी यामुळे सोने खरेदीत मंदीचे वातावरण होते. त्यानंतर विजयादशमीला शहरातील सुवर्ण पेढी गजबजून गेल्या होत्या. शहरातील 150च्या वर असलेल्या सुवर्ण पेढींमधून उलाढालीचा नक्की आकडा मिळाला नसला तरी करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे जाणकारांनी सांगितले. एरव्ही नवरात्रात सुवर्ण बाजारात खरेदी वाढतेच. त्या प्रमाणे यंदाही गेल्या आठवडय़ापासून सराफ बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. या दिवसात भाव कितीही असले तरी ग्राहक सोन्याची खरेदी करतातच.
सोन्याचे दर चार दिवसांपासून कमी-कमी होत गेल्याने त्याचाही फायदा घेत सुवर्ण बाजारात खरेदीचा उत्साह आणखी वाढला. ऐन दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा मानस असलेल्या ग्राहकांसाठी ही ‘सुवर्ण’ संधीच ठरली. 26 सप्टेंबर रोजी असलेले 30 हजार 400 रुपये भाव 27 रोजी 30 हजार 300 रुपये झाले. 28 रोजी 30 हजार 200 रुपये आणि 29 व 30 रोजी 30 हजार 100 रुपये भाव झाले होते.
विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहिला. विविध योजनांचाही ग्राहकांकडून फायदा घेतला जात आहे. - मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर.सी. बाफना ज्वेलर्स