जळगाव: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला कोणत्याही शुभकार्याची केलेली सुरूवात चांगली मानली जाते पण यंदाचा दसरा यासाठी अपवाद ठरत आहे. भूमिपूजन, वास्तूशांतीसाठी मुहूर्त नाहीत, अशी माहिती पंचांग अभ्यासकांनी दिली आहे. जळगावचे पंचांग अभ्यासक नंदू शुक्ल गुरूजी यांनी सांगितले, की साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसरा असला, तरी यंदा १ ऑक्टोबरपासून शुक्राचा अस्त सुरू झाला आहे. त्यामुळे भूमिपूजन, वास्तूशांती यासाठीचे मुहूर्त नाहीत. शमी पूजन, अश्वपूजन, शस्त्रपूजन करण्यासाठी दुपारी २.२६ ते ३.१३ वाजेपर्यंत विजय मुहूर्त आहे. सीमोल्लंघन, देवीचे पूजन करण्यात कसलाही अडथळा नाही. कुळाचार, कुळधर्म हे नेहमीप्रमाणे करण्यास हरकत नाही. १७ नोव्हेंबरला शुक्राचा उदय होईल. तेव्हापासून लग्न, मुंज, वास्तूशांती, प्राणप्रतिष्ठा यांचे मुहूर्त सुरू होतील.
दरम्यान, दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ग्राहकांच्या गर्दीने जळगाव शहरातील बाजारपेठ गजबजली होती. विविधपयोगी वस्तूंसह, फुले व पूजा साहित्याची खरेदी केली गेली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना चांगली मागणी आहे. होम अप्लायन्सेसमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या वस्तूंमध्ये फ्रीज, वॉशिंग मशिन, एसी, मायक्रोवेव्ह यांचा समावेश आहे. त्या खालोखाल डिश वॉशर, घरघंटी, मिक्सर आदी वस्तूही खरेदी केल्या जात आहे. ऑनलाइनपेक्षा जळगावचे मार्केट किफायतशीर
ऑनलाइन शॉपिंगची सुरुवातीला व्यापाऱ्यांना धास्ती होती मात्र, त्यालाही आता जळगावकरांनी टक्कर दिली आहे. ऑनलाइनच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षाही कमी दर जळगावमध्ये देण्यात येत आहेत. शिवाय उत्पादनांना वॉरंटी अधिक मिळत आहे. स्थानिक पातळीवर खरेदी केल्यास विक्री पश्चात मिळणाऱ्या सर्व्हिसचा फायदा ग्राहक होतो, अशी माहिती निखील मुंदडा यांनी दिली.
नेटवर्क नाही, तरीही फाईव्ह जीची खरेदी जोरात
देशातील निवडक शहरात मोबाईलचे फाईव्ह जी नेटवर्क सुरू झाले असून, यामध्ये महाराष्ट्रातील दोन महानगरांचा समावेश आहे. जळगाव शहरातील मार्केटमध्येही फाईव्ह जी नेटवर्कचे मोबाईल उपलब्ध झाले आहेत. नवीन खरेदी असल्यास ग्राहक या मोबाइलला प्राधान्य देत आहेत. साडेबारा हजारांपासून ते १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत त्यांच्या किंमती आहेत, अशी माहिती रिंकल अजमेरा यांनी दिली.
झेंडूची आवक, दर महाग
दसरा म्हटला म्हणजे झेंडूच्या फुलांना मागणी असते. सकाळपासूनच झेंडूच्या फुलांचे ढीग विक्रीसाठी लागले होते. दुपारपर्यंत ८० ते १२० रुपये किलोप्रमाणे त्यांचे दर होते. संजय बारी म्हणाले, की पावसामुळे फुलांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी फुले महाग आहेत. शेवंती ५०० रुपये किलो असून, गुलाब ७ ते १० रुपये प्रतिनग, असे दर आहेत.
वाहन बाजारात बूम
नवरात्र, दसरा आणि दिवाळीत वाहनांचीही खरेदी केली जाते. नववी व विजयादशमी या दोन दिवसांत दोन हजारांपेक्षा अधिक दुचाकी वाहने जळगाव शहरातील विक्रेत्यांकडून विक्री होतील, असा अंदाज आहे. ग्राहकांनी दसऱ्याच्या आधीच दुचाकींचे बुकिंग केले होते, अशी माहिती विवेक जोशी यांनी दिली. चारचाकी वाहनांची बाजारपेठही तेजीत आहे. दसऱ्याच्या दिवशी जळगाव शहरातून २५० ते ३०० वाहनांची डिलिव्हरी होईल. या वाहनांसाठी दोन ते तीन महिने आधीपासून बुकिंग करण्यात आले आहे. मात्र, दसऱ्याला जे बुकिंग करतील, त्यांना दिवाळीपर्यंत वाहन मिळेल. ग्राहकाने वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे पासिंग, नंबरप्लेट आदी कामे पूर्ण करून, मगच वाहन ग्राहकाच्या ताब्यात दिले जाते, अशी माहिती प्रदीप गिरासे यांनी दिली.
एक टन श्रीखंड गोडवा वाढविणार
दसरा आणि श्रीखंड यांचे अतूट नाते आहे. पूर्वी श्रीखंडासाठीही ॲडव्हान्स बुकिंग केले जायचे. आता श्रीखंडाचा मुबलक पुरवठा व उपलब्धता आहे. दसऱ्याला जळगाव शहरात विविध डेअरींचे मिळून एक टन श्रीखंड विकले जाईल, अशी माहिती मुकेश टेकवानी यांनी दिली.