जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न ८३ महाविद्यालयांमध्ये तासिकातत्त्वावर नियुक्त प्राध्यापकांचे मानधन महाविद्यालयांकडून वेळेत प्रस्ताव न आल्यामुळे निघू शकलेले नाही. सप्टेंबरअखेरचे मानधन केवळ ३४ महाविद्यालयांना वर्ग झाले आहे. त्यामुळे ऐन दसरा व दिवाळीसारख्या सणात प्राध्यापकांच्या हातात पैसा नसेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
अनुदानित महाविद्यालयांमधील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयामार्फत करण्यात येते. विहित पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती महाविद्यालय स्तरावर केली जाते. त्यांना मान्यता विद्यापीठाकडून मिळते. तोपर्यंत महाविद्यालयांना संबंधित प्राध्यापकांच्या मानधनाचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे सादर करता येत नाही. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच मानधन सुरू होते. विद्यापीठाकडून मिळणारी मान्यता त्या-त्या शैक्षणिक सत्राच्या कालावधीपुरती असते. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचेही मानधन दरमहा निघायला हवे, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून पाठपुरावा केला जातो, महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात येते. पण, त्यांना मिळणारा प्रतिसाद फार काही चांगला नसल्याचे दिसून आले आहे.
तासाला ९०० रुपये मिळताततासिका तत्त्वासाठी तासाला (६० मिनिटे) ९०० रुपये मानधन मिळते. एक आठवड्यात कमाल नऊ तासिका या प्राध्यापकांना लावता येतात. प्रात्यक्षिकासाठी ३५० रुपये मिळतात. पूर्वी तासाला ६५० रुपये मिळायचे. दि. १ एप्रिल २०२३ पासून त्यामध्ये वाढ झाली आहे.
३९ महाविद्यालयांकडून प्रस्ताव येणे बाकीखान्देशात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात अनुदानित ८३ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावरील ६१७ प्राध्यापक कार्यरत आहेत. एका पूर्णवेळ प्राध्यापकाच्या रिक्त पदासाठी तासिका तत्त्वावर दोन प्राध्यापक नियुक्त होतात. मानधनासाठी ३४ महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यामुळे सप्टेंबर २०२३ अखेर २१४ प्राध्यापकांना मानधन मिळाले. त्यानंतर आणखी १० महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले. त्यावर कार्यवाही सुरू झाली आहे, तर ३९ महाविद्यालयांकडून प्रस्ताव येणे बाकी आहेत.
त्रुटी नसल्यास लवकर मंजुरीसीएचबी प्राध्यापकांना मान्यतेच्या प्रस्तावात त्रुटी असतील, तरच त्यांना विलंब होतो. अन्यथा हे प्रस्ताव लवकर निकाली काढले जातात, अशी माहिती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी दिली.
प्राचार्यांचे मानधन रोखामहाविद्यालये सीएचबी मानधनाचे प्रस्ताव दरमहा सहसंचालक कार्यालयाला वेळेत पाठवत नाहीत. त्यामुळे शासन निर्णय व वेळोवेळी काढण्यात आलेल्या परिपत्रकांचे उल्लंघन होत आहे. सहसंचालक कार्यालयाने कायम आणि तात्पुरत्या नियुक्त प्राध्यापकांचे मासिक बिलाचे प्रस्ताव एकाचवेळी स्वीकारावेत. शासन निर्णय आणि आदेशांचे पालन न करणाऱ्या प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांसह प्राचार्यांचे मानधन रोखून कडक कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य समन्वयक नितीन घोपे यांनी केली आहे.
महाविद्यालय स्थिती : विनानुदानित महाविद्यालये : ८३तासिका तत्त्वावर कार्यरत प्राध्यापक : ६१७सप्टेंबर २०२३ अखेर प्राध्यापकांना मानधन : २१४