अत्रि ऋषींनी अत्यंत तपश्चर्येचा शुभारंभ केला. एका पायावर उभे राहून, उर्ध्वबाहू करून केवळ वायूभक्षण करत सतत १०० वर्षे अत्रिमुनींनी तपश्चर्या केली. तपकाळात अत्रींच्या नेत्रांपासून सोम व शिवांशापासून दुर्वास झाला. पण अत्रिंचे समाधान होईना; शेवटी परमपिता परमात्मा त्यांना प्रसन्न झाला. त्या आनंदघन परमात्म्याने आपला आत्माच अत्रिऋषींना दान दिला. अनुसुयेच्या उदरी निराकार, परब्रह्म परमेश्वर, आनंदकंद, परमात्म्याने जीव उध्दारासाठी चिरायु अवतार धारण केला. गर्भसंभुती झाल्यावर अनुसुयेच्या आनंदाला भरती आली. अनुसुयेचे तेज, अधिकाधिक वाढू लागले ऋषिपत्नी अनुसुयेभोवती गर्दी करु लागल्या.बद्रिकाश्रमात तथा समस्त ऋषिकुळात आनंद पसरला आणि मार्गशिर्ष शुध्द चतुर्थीला शुक्रवारी अरूणोदयाच्या सुरम्य प्रभाती अनसुयेने आरक्त वर्णाच्या, विशाल नेमाच्या, सर्व लक्षणांनी पूर्ण अशा सौंदर्यवान, मनोहर बाळाला जन्म दिला. अत्रिऋषी व अनसुया माता तर त्या बाळाच्या आगमनाबरोबर त्याच्या आल्हादकारी दर्शनाने आनंदसागरात डुंबून गेले. यक्ष, किन्नर, नारद, तुंबर, गंधर्वादिक स्तुतीस्तवने गाऊ लागले. सुरगणांनी पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त केला. पुत्र जन्मोत्सवाचा अप्रतिम सोहळा अत्यंत हर्षभरीत होऊ लागला. बाळाचे नाव ठेवण्यासाठी भृगु ऋषींनी चिंतन केले. तपश्चर्येच्या प्रसंगी घडलेल्या घटनांचा विचार झाला. अत्रिमुनींनी आपले अनुभव कथन केले. अत्यंत उंच, स्थानाहून ज्योर्तिमय शक्तीने माझ्या करांगुळीत दिव्य प्रकाशमय लाल रत्नासारखे अर्भक ठेवले. या अनुभुतींचाच प्रत्यक्ष हा साक्षात्कार आहे, असे ऋषिमुनींनी कथन करताच भुगृ ऋषिंनी विस्मयचकित नजरेने लांबवर आकाशात दृष्टी खिळवली आणि म्हटलं ऋषिवर! .....बाळ सामान्य नाही. बाळाचे नाव सैंगऋषि हेच योग्य आहे. सैग ...उंच उत्तुंग त्या परमोच्च दिव्यपरात्पर परमात्म्यांचाच हा कृपाप्रसाद आहे. म्हणून सैंगर्षी आणि हो त्या परमात्म्याने आत्माच दान दिला म्हणून ना! तर त्याचे दुसरे नाव दत्त ठेवा. दत्त =दान दिलेला. हा परमात्म्याचाच अवतार. दत्त+आत्रेय=दत्तात्रेय.- कविश्वर कूलभूषण चोरमागे शास्त्री(संकलन- मधुकर पुजारी.)
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 10:55 PM