लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात ई-पास नावालाच असून ‘आओ जाओ घर तुम्हारा’, अशी परिस्थिती आहे.
लोकमत प्रतिनिधीने शनिवारी शहराच्या पाचही प्रवेशाच्या मार्गावर पाहणी केली असता ही परिस्थिती दिसून आली. दिवसा चारही प्रवेशाच्या मार्गावर एकही पोलीस तैनात नव्हता. शहरात ठिकठिकाणी पोलीस होते. मात्र, तिथे कुणाला अडवले जात नव्हते. संध्याकाळी सहा ते आठ मात्र अतिशय कडक तपासणी केली जात होती. स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे रस्त्यावर उतरले होते.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात ई-पासशिवाय कुठल्याही शहरात आता प्रवेश दिला जात नाही. यावेळी ई-पास देण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे.
पाच प्रमुख मार्ग; एकही कर्मचारी नाही
शहरात प्रवेशाचे चार मार्ग आहेत. भुसावळकडून येणाऱ्या मार्गावर कालिंका माता चौकात शहरात एन्ट्री मिळते. पुढे औरंगाबादकडून अजिंठा चौकात, धुळ्याकडून येताना खोटेनगर, चोपडा- यावलकडून येताना ममुराबाद नाका तर पाचोराकडून येताना डी मार्टजवळ प्रवेश मिळतो. शनिवारी या सर्व ठिकाणी एकही पोलीस नव्हता.
ममुराबाद नाका
ममुराबाद नाक्यावर संध्याकाळी पाहणी केली असता एकही पोलीस नव्हता, त्यामुळे तपासणीचा प्रश्नच नाही. भिलपुरा चौकीजवळ कर्मचारी तैनात होते.
कालिंका माता चौक
भुसावळकडून येणाऱ्या मार्गावर कालिंका माता चौकातून प्रवेश मिळतो या चौकात संध्याकाळी एकही कर्मचारी नव्हता पुढे अजिंठा चौफुलीवर मात्र शहर वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी तैनात होते. त्यांच्याकडून कोणत्याही वाहनाची तपासणी केली जात नव्हती. याच चौकातून औरंगाबादकडून शहरात प्रवेश होतो.
खोटेनगर थांबा
धुळेकडून येणाऱ्या वाहनांना खोटेनगरातून शहरात प्रवेश मिळतो. दिवसभर या ठिकाणी एकही पोलीस नव्हता. संध्याकाळी काही पोलीस दिसून आले. त्यामुळे ई-पास नावालाच राहिला.
एकाच दिवशी ९०० अर्ज
शासनाने आंतरजिल्हा प्रवेशासाठी ई-पास पद्धत लागू करताच शनिवारी पोलीस दलाकडे परवानगीसाठी ९०० अर्ज प्राप्त झाले. त्यातील निम्म्याहून जास्त पास हे जिल्ह्यातीलच प्रवेशाचे होते, जिल्ह्यात या पासची गरज नाही. बाहेरदेखील विवाह सोहळा, निधन व रुग्ण ने-आणसाठीच पास मिळणार आहे. यासाठी देखील अर्ज करताना पुरावा जोडावा लागणार असून अर्जदार पुरावेच जोडत नसल्याचे दिसून आले.