लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आंतरजिल्हा प्रवासासाठी आता पोलिसांनी ई-पासची सक्ती केली असल्याने हे पास काढून देणारे एजंट जिल्हाभरात सक्रिय झाले आहेत. आता या पाससाठी प्रत्येकी दोनशे रुपयेदेखील घेत आहेत. त्यासाठी सोशल मीडियातून त्याची जाहिरात केली जात आहे.
सध्या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात राज्य शासनाने आंतरशहर आणि आंतरजिल्हा बंदी लागू केली आहे. त्यामुळे परजिल्ह्यात जर अत्यावश्यक कारणासाठी जायचे असेल तर पासची गरज भासत आहे. मात्र यंदा महसूल प्रशासनाऐवजी पोलिसांनीही पास देणे सुरू केले आहेत. त्यामुळे या कर्फ्यूमध्ये जर आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल, तर हा पास सोबत बाळगावा लागतो. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये असे पास दिले गेले. त्यात अनेक एजंट्सनी आपले उखळ पांढरे करून घेतले. यंदा पोलिसांनी पास लागणार हे जाहीर करताच पुन्हा एकदा गेल्यावेळचे एजंट समोर आले आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी ई-पासचा धंदा सुरू केला आहे.
एजंटच तयार करून देतात कागदपत्रे
ई-पाससाठी लागणारी कागदपत्रेदेखील हेच एजंट तयार करून देत आहेत. त्यात वैद्यकीय फॉर्मचा समावेश आहे. याचा छापील नमुना या एजंटकडे आधीच तयार आहे. त्यावर फक्त जाणाऱ्याचे नाव आणि डॉक्टरची सही केली की तो पुढे जोडला जातो. या सर्व प्रकारासाठी हे एजंट दोनशे ते तीनशे रुपये घेतात.
‘लोकमत’ प्रतिनिधीने केली पडताळणी
ई-पास बनवून मिळेल, अशा जाहिराती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘लोकमत’ने त्यावरून एका भडगाव तालुक्यातील एजंटसोबत संवाद साधला. त्या एजंटने कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती दिली. तसेच छापील वैद्यकीय अर्जाचा नमुनादेखील पाठवला. त्यावर डॉक्टरची सही आणा, लगेच ई-पास मिळवून देण्याचे आश्वासनदेखील दिले.