जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन हे सोमवारी सकाळी पदभार स्वीकारणार आहेत.
कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी कुलगुरुपदाचा राजीनामा दिला असून तो राज्यपाल तथा कुलपतींनी मंजूर केला आहे. त्यामुळे प्रभारी कुलगुरू म्हणून प्रा.ई.वायुनंदन यांच्याकडे पदभार सोपविला आहे. प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून प्रा.वायुनंदन हे सोमवारी सकाळी पदभार स्वीकारतील. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्रा.वायुनंदन हे गेली चार वर्षांपासून काम पाहत आहेत. तीस वर्षांपासूनचा त्यांना अध्यापन व संशोधनाचा अनुभव आहे. कुलगुरू होण्यापूर्वी ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात १९८७ पासून कार्यरत होते. आपत्ती व्यवस्थापन या विषयात त्यांनी पदविका घेतली असून लोकप्रशासन या विषयात त्यांनी पीएच.डी. केलेली आहे. पाच पुस्तके त्यांनी लिहिलेली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केलेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झालेले आहेत.
सोमवारी पदभार स्वीकारणार असून सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. विद्यार्थ्यांसह इतरांच्या ज्या अडचणी असतील, त्या सोडविण्याचा प्रयत्न आधी असेल. रूजू झाल्यानंतर दीक्षांत समारंभ लवकरात लवकर घेण्यासाठी नियोजन करणार आहे.
-प्रा. ई.वायुनंदन, प्रभारी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ