जळगाव : महामार्गावर ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या सनी उर्फ प्रफुल्ल बळीराम खरोटे (वय १९, रा.अयोध्या नगर) या तरुणाचा शनिवारी सकाळी ७ वाजता उपचार सुरु असताना मृत्यू झाला. एकीकडे मोठ्या भावाचा मृतदेह तर दुसरीकडे लहान भावाचा दहावीचा इंग्रजीचा पेपर असा दुर्देवी प्रसंग खरोटे कुटूंबावर ओढवला. पेपर दिल्यानंतर सनीवर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.साईडपट्टीवरुन महामार्गावर लागणाºया ट्रकवर सनी याची दुचाकी आदळली होती. त्यात डोक्याला गंभीर मार लागल्याने सनी जखमी झाला होता. ८ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० वाजता हा अपघात झाला होता. त्यादिवसापासून सनी याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होता. शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, दहावीत असलेला लहान भाऊ शुभम याने भावाचे दु:ख सहन करीत पेपर सोडविला. त्यानंतर सनी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.सनी याने काही दिवसापूर्वी अंजिठा चौफुलीजवळ नाश्ताच्या गाडी लावली होती. वडील बळीराम गणपत खरोटे हे एमआयडीसीमध्ये एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. आई भारती गृहिणी आहे. त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच नातेवाईकांसह मित्र परिवाराने रुग्णालयात गर्दी केली.सनी याचा लहान भाऊ शुभम हा सिध्दीविनायक शाळेत दहावीत आहे. त्याचा दहावीचा पेपर आर.आर.शाळेत होता. सकाळी मोठा भाऊ सनी याला काळाने हिराविले. या दु:खाचे अश्रु डोळ्यात साठवून शुभमने दहावीचा इंग्रजीचा पेपर सोडविला. पेपर सोडवून घरी आल्यानंतर आपल्या भावाला निरोप दिला.