लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाने आता रेशनवर मका आणि ज्वारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारकांना गव्हा ऐवजी मक्याची पोळी खावी लागणार आहे. अंत्योदय योजनेनुसार एका कुटुंबाला ३५ किलो धान्य मिळते. त्यात आता प्रत्येक कार्ड धारकाला गहु कमी होऊन त्या ऐवजी मका आणि ज्वारी मिळणार आहे. त्याचा दर हा एक रुपयाच आहे. त्यात सर्वात जास्त मक्याचे वितरण चोपडा, धरणगाव, जळगाव आणि अमळनेर तालुक्यात होणार आहे.
रेशन कार्डवर अंत्योदय आणि प्राधान्य रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना शासनाने गहु कमी करून त्या ऐवजी भरडधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा निर्णय आता अंमलात आणला जात आहे. खान्देशात ज्वारीची भाकरी आणि गव्हाच्या पोळ्या खाल्ल्या जातात. मात्र या मक्याचे काय? करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात जळगाव तालुक्यात एका महिन्याला एका कुटुंबाला अंत्योदय योजनेत १० किलो मका मिळेल. गव्हा पेक्षाही मका जास्त मिळणार आहे. खान्देशी खाद्य संस्कृतीत मक्याचा फारसा वापर केला जात नाही. त्यामुळे या मक्याचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे.
तालुकानिहाय वितरण वेगळे
शासनाने यंदा मका खरेदी जास्त केली आहे. त्यामुळे ज्या तालुक्यातून जास्त मका खरेदी केला गेला तेथे या मक्याचे जास्त वितरण केले जाणार आहे. अंत्योदय योजनेत गव्हाचे वितरण हे प्रति कुटुंब २५ किलो केले जात होते. मात्र आता या २५ किलो गव्हाचे वितरण कमी करून त्या ऐवजी भरडधान्य मका आणि ज्वारी दिली जाणार आहे. यात जळगाव तालुक्यात १० किलो, धरणगाव तालुक्यात १४ किलो, चोपडा आणि अमळनेर येथे प्रत्येकी ११ किलो मका दिला जाणार आहे. इतर तालुक्यातही याचे प्रमाण वेगवेगळे आहे. पारोळा, एरंडोल आणि चाळीसगावला भरड धान्य वितरण नाही. पारोळा, एरंडोल आणि चाळीसगाव या तीन तालुक्यांमध्ये गव्हा ऐवजी ज्वारी, मका यांचा पुरवठा केला जाणार नाही. अंत्योदय योजनेत प्रत्येक कुटुंबाला २५ किलो गहु दिले जात होते. इतर तालुक्यांमध्ये गहु कमी करून त्या ऐवजी मका दिला आहे. मात्र या तीन तालुक्यांमध्ये ज्वारी आणि मका दिला जाणार नाही. त्यांना प्रत्येक कार्ड धारकाला २५ किलो गहुच दिला जाणार आहे. त्याचसोबत प्रत्येक कार्ड धारकाला १० किलो तांदुळही दिले जातात.
कोट - सरकारने आता गहु कमी करून मका दिला आहे. आता हा मका कसा खायचा, हा प्रश्न आहे. काही वर्षांपुर्वी एक लाल गहु आणला होता. आता मका दिला आहे. त्यापेक्षा ज्वारी तरी जास्त द्यायला हवी होती. - आत्माराम पाटील
कोट - मका थोडा कमी करून त्या ऐवजी ज्वारी किंवा गहुच शासनाने द्यायला पाहिजे एवढ्या दहा किलो मक्याचे करणार तरी काय, गव्हामध्ये एकत्र करून त्याचे पीठ करू शकतो. पण त्यातही दहा किलो मका संपणार नाही - विठ्ठल पाटील.
जिल्ह्यातील शिधापत्रिका धारक
अंत्योदय - १३७७४९
प्राधान्य - ४७०९५०
एपीएल - ३२३०११
पांढऱ्या शिधा पत्रिका - ७४९०३
एकुण शिधापत्रिका - १००६६१३