लोकमत न्यूज नेटवर्क
पहूर, ता. जामनेर : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पहूर ग्रामीण रुग्णालयाचे ग्रहण सुटता सुटत नाही. रिक्त पदांमुळे डॉक्टरअभावी पुन्हा शवविच्छेदन व नाॅन कोविड सुविधा कोलमडल्याने कोरोना महामारीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वास्तव समोर आले. आरोग्य विभागाला गांभीर्य नसल्याचे उघड झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण पहूरची ओळख. पंचवीस खेड्यांचा संपर्क. राष्ट्रीय महामार्गावर असल्याने छोटेमोठे अपघांतासह अकस्मात घटनांची संख्या मोठी. आजमितीला शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नाहीत. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे सेवा बजावत असून पहूर रुग्णालयाचा अतिरिक्त भार त्यांच्या खांद्यावर असल्याने पहूर येथे पूर्ण वेळ रुग्णसेवा देण्यास अडचणी येत आहे. गेल्या दोन वर्षापासून तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप कुमावत, डॉ. मंजूषा पाटील व डॉ. सचिन वाघ यांनी रुग्ण सेवा पूर्ववत ठेवण्यासाठी मोलाची सेवा पुरविली. पण रुग्णसेवेचा कंत्राटी करार संपुष्टात आला व पदव्युत्तर शिक्षणासाठी या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने सेवा कोलमडली. त्यामुळे विद्यमान वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे यांची नियुक्ती शेंदर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात असली तरी पहूर येथे प्रतिनियुक्तीवर एक वर्षापासून एकटे खिंड लढवित आहेत.
शासन निकषानुसार शवविच्छेदन व इतर शासकीय अधिकार वानखेडेंना नाही. याचा फटका आरोग्य सेवेला बसला असल्याने शवविच्छेदन व घडलेल्या घटनांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पोलिसांना व नागरिकांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हेलपाटे मारावे लागतात. प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांना पहूर येथे पूर्णवेळ रुग्णसेवा देण्याचे लिखित स्वरूपात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांचे आदेश असले तरी पहूर रुग्णालयात पदे रिक्त असल्याने चांदा यांना अतिरिक्त सेवा देताना दमछाक होते. या टोलवाटोलवीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लसीकरण व कोविड उपचार डॉ. वानखेडेंना करावे लागत असल्याने शासन याविषयी संवेदनशीलता दाखविण्यात असमर्थ ठरत असल्याने नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार रुग्णालयात सुरू आहे.
ग्रहण २००४ पासून २००४ पासून सेवा डळमळीत झाली. २०११ पासून तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गरूड यांनी तीन वर्षे अखंडित सेवा पुरविली. त्यांचे मदतीसाठी डॉ. अतुल सोनार होते. यानंतर रुग्णालयाचे गतवैभव निर्माण होण्यापेक्षा डाॅक्टरांच्या रिक्त पदामुंळे रुग्णसेवा सलाईनवर आली. १९९६ पासून एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने मनुष्यबळ तोकडे आहे. नियुक्त होणाऱ्या एका अधिकाऱ्यावर अतिरिक्त ताण येत असल्याने वारंवार डाॅक्टर नियुक्तीच्या प्रश्नाने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
माझ्या चार वर्षाच्या कालावधीदरम्यान पहूर रुग्णालयाची रुग्ण सेवा अखंडित ठेवण्यासाठी जिल्ह्यातून प्रथम प्राधान्य पहूरला दिले आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सकारात्मक व मानसिक आधार मिळाला नाही. याची खंत असून रुग्णसेवेवर परिणाम करणारी आहे. स्थानिकांनी याचा गंभीर विचार करावा. संबंधित प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांना पहूर येथे पूर्ण वेळ रुग्णसेवा पुरविण्यासाठी लिखित स्वरूपात पत्र दिले आहे.-डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव
जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेचा मोठ्या प्रमाणावर ताण आहे. ही सेवा सांभाळताना पहूर येथे अतिरिक्त सेवा देताना गैरसोय होत आहे. वरिष्ठ स्तरावरून मला पहूर येथे पूर्ण वेळ रुग्ण सेवा देण्याचे लिखित स्वरूपात कोणतेही पत्र मिळाले नसून मी प्रभारी वैद्यकीय अधिकारी आहे. त्यामुळे जामनेर उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणे मला बंधनकारक आहे.-डॉ. हर्षल चांदा, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पहूर