विविध शासकीय योजना राबवायच्या म्हणजे त्यासाठी यंत्रणा व त्यासोबतच तांत्रिक अडचणींचीही पूर्तता होणे गरजेचे असते; मात्र तांत्रिक अडचणींनी विविध योजनांना फटका बसतो. आता अशाच प्रकारे महाडीबीटी पोर्टलला गती येत नसल्याचे चित्र आहे. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणलेल्या एकात्मिक संगणकीय प्रणाली शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणारी असली तरी रेंज व्यवस्थित मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. ग्रामीण भागात तर रात्रीच्या वेळी सायबर कॅफेवर जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. शिक्षकांची ऑनलाइन हजेरी, आता विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम असो की सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी असणाऱ्या पॉस मशीनचा प्रश्न असो, या सर्वांसाठी इंटरनेटची आवश्यकता असताना अनेक ठिकाणी रेंज व्यवस्थित नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. आता अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या एकात्मिक संगणकीय प्रणालीलाही अडचणी येत आहेत. कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या अंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपला वैयक्तिक मोबाइल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करावा लागत आहे. ही सर्व प्रक्रिया शेतकरी करीत आहेत; मात्र रेंज व्यवस्थित नसल्याने अडचणी येत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना संकेतस्थळावरील शेतकरी योजना पर्याय निवडणे, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी) ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागतो, तसेच वैयक्तिक लाभार्थी म्हणून शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागतो; मात्र यासाठी रेंज मिळाली म्हणजे खऱ्या अर्थाने योजनेचा लाभ मिळू शकेल, एवढी अपेक्षा व्यक्त होत आहे.
योजनांना रेंजचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:20 AM