विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भाववाढ होत असलेल्या खाद्यतेलाचे भाव काहीसे कमी झाले असून, यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. सर्वाधिक वापर असलेल्या सोयाबीन तेलाचे भाव १० रुपयांनी कमी होऊन १४५ रुपये प्रति किलोवर आले आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भाव कमी झाल्याने महागाईची काहीशी चिंता कमी झाली आहे.
दररोज प्रत्येक घर तसेच खाद्यपदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम स्वयंपाकघराच्या ‘बजेट’वर होत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यतेलाच्या भावात वाढ होऊन महागाईचा चांगलाच तडाखा बसला. खाद्यतेलाच्या कच्च्या मालाचे भाव वधारण्यासह अमेरिकन डॉलरचेही दर वधारत असल्याने त्याचा खाद्यतेलाच्या भावावर परिणाम होऊन त्याच्या भावात चांगलीच वाढ होत गेली.
यात घरोघरी व खाद्यपदार्थांच्या व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या सोयाबीन तेलाचे भाव कधीपासूनच शंभरी पार जाऊन हळूहळू ते १५० रुपयांच्या पुढे पोहोचले. सोयबीनचे भाव वाढल्याने तेलातही भाववाढ झाली होती. मात्र आता सोयाबीनचे भाव गडगडले व तेलाचेही भाव कमी होण्यास मदत होत गेली.
म्हणून दर झाले कमी
गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या भावात मोठी वाढ होत होती. कच्च्या मालाचे भाव वाढत गेल्याने ही भाववाढ होत होती. आता कच्च्या मालाचे भाव कमी झाले व तेलाचेही भाव कमी होण्यास मदत झाली.
- बाबू श्रीश्रीमाळ, व्यापारी
किराणा खर्चात बचत
गेल्या अनेक दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात काहीशी घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे. तेलाचे भाव वधारल्याने महागाईच्या झळा चांगल्याच बसत होत्या. आता किराणा खर्चात बचत होईल.
- योगिता चौधरी, गृहिणी
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईत खाद्यतेलाचेही भाव वाढल्याने घर कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. खाद्यतेलाचे भाव कमी झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे.
- दीपाली महाले, गृहिणी
तेलाचे दर (प्रति किलो)
तेल-ऑगस्ट-सप्टेंबर
सोयाबीन-१५५-१४५
सूर्यफूल-१६५-१६०
पामतेल-१३८-१३०
शेंगदाणा-१९०-१८०
तीळ-२००-२००