संजय सोनार
चाळीसगाव - काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या कुटुंबांना कसे तरी जीवन जगावे लागत आहे. आधीच हातात पैसे नाहीत. अशातच काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे भाव चांगलेच कडाडले असल्याने महिलांचे स्वयंपाक घरातील नियोजन कोलमडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
विशेष म्हणजे किराणा वस्तूंमध्ये खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. मागीलवर्षी ८० ते ८५ रुपयांना मिळणारे एक लीटर तेलाचे पॅकेट आता १५५ रुपयांपर्यंत पाेहाेचले आहे. म्हणजेच खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे ७० रुपयांची वाढ झाली. सूर्यफूल तेलाचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढले आहेत. सद्य:स्थितीत बाजारातील भाव सोयाबीन तेल १५६ रुपये प्रति किलो, सूर्यफूल १८० रुपये तर शेंगदाणा तेल १७० रुपये किलो प्रमाणे असा आहे. खाद्यतेल दरवाढीने उच्चांक गाठला आहे. दरवाढीमुळे महिला त्रस्त झाल्या असून, गृहिणींचे स्वयंपाकघरातील आर्थिक गणित बिघडले आहे. डाळींपाठोपाठ खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दररोजच्या आहारात खाद्यतेलाचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या कुटुंबात आवडीनुसार पामतेल, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, करडई तेल हे रोज स्वयंपाकात वापरले जाते. तेलाचे भाव वाढल्याने महिलांनी आहारात खाद्यतेलाचा वापर कमी प्रमाणात सुरू केला आहे. यामुळे भाज्यांना तडका देणे महाग झाले आहे. कोरोना संसर्गामुळे आर्थिक चणचण असतानाच खाद्यतेल, डाळी, गॅस सिलिंडर आदींची दरवाढ व महागाई नाकीनऊ आणणारी ठरत आहे. त्यामुळे शासनाने महागाईला आळा घालावा, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजार, नैसर्गिक आपत्ती, वाढीव कस्टम ड्युटी आणि तेलाचा कृत्रिम साठा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तेलाच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट, ‘लॉकडाऊन’चा बसलेला फटका यातून सावरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची गेल्या काही महिन्यांपासून धडपड सुरू आहे. अनेकांची आर्थिक ओढाताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचा दर आलेख मात्र चढताच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत आहे.
अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. त्याचा फटका तेलाच्या दाराला बसला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे.
- नंदू सुराणा, किराणा मॉल मालक, चाळीसगाव
यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आवक होऊ शकली नाही. त्यामुळेच सात-आठ महिन्यात खाद्यतेलात दुप्पटीने वाढ झाली आहे.
-बबलू पंजाबी, किराणा व्यावसायिक, चाळीसगाव
गेल्या वर्षांपासून एकतर कोरोनामुळे व्यवहार ठप्प राहण्यासह अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात तेल दरवाढीमुळे सर्वसामान्याचे बजेट कोलमडले आहे. घरखर्च सांभाळताना महिलांना किती काटकसर करावी, हा प्रश्न पडला आहे.
-सुरेखा राजेंद्र महाजन, गृहिणी, देवकरनगर, चाळीसगाव
महागाईने चिंता वाढवली आहे.गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाबरोबरच गॅस व डाळींचे भावही सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महिलांना अधिक काटकसरीवर भर दिला आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे.
-राखी विकास विसपुते, लक्ष्मीनगर,चाळीसगाव