जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर झालेली 'ईडी'ची कारवाई ही अयोग्य असल्याचे म्हणत, भाजप खासदार रक्षा खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. खडसेंवरील कारवाई ही 'ईडी'च्या दृष्टीने योग्य असली तरी आमच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. हा विषय सध्या न्यायालयाच्या कक्षेत असल्याने त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
जळगाव जिल्हा भाजप कार्यालयात खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त गेल्या आठ वर्षातील केंद्र सरकारच्या कामांचा आढवा त्यांनी या पत्रकार परिषदेत घेतला. दरम्यान, यावेळी त्यांना 'ईडी'कडून खडसे कुटुंबीयांच्या जप्त केलेल्या मालमत्ता खाली करण्याच्या नोटिसीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी खासदार खडसे म्हणाल्या, ‘ईडी’ व एकनाथ खडसे दोघांनीही आपापली बाजू मांडली आहे. ‘ईडी’ ला कारवाई योग्य वाटते तर आम्हाला योग्य वाटत नाही. यात आता दोन्ही पक्ष न्यायालयात गेले आहेत. याबाबत कोर्टात निर्णय होईल, त्यामुळे यावर अधिक बोलता येणार नसल्याचेही त्या म्हणाल्या.
आठ वर्षातील योजनांचा आढावा केला सादर -यावेळी खासदर रक्षा खडसे यांनी गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती सांगितली. उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजना, पंतप्रधान आवास योजना, आयुषमान भारत योजना या योजनांमुळे जनतेला फायदा झाला आहे. तसेच काश्मिरमधील कलम 370 रद्द करणे, तिहेरी तलाक रद्द करणे, राममंदिर असे चांगले निर्णय केंद्राने घेतल्याचेही त्यांनी सांगितले.