नानाभाऊ महाजन यांचा आरोप : अध्यक्षांची परवानगी न घेतल्यामुळे शासनाकडे तक्रार करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी अध्यक्षांची परवानगी न घेता परस्पर जिल्ह्यातील ५९ शाळांमध्ये वर्ग खोल्याबाबत प्रस्ताव तयार केल्या प्रकरणी सदस्य नानाभाऊ महाजन यांनी जि.प. अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. तसेच या प्रकाराबाबत शिक्षणाधिकाऱ्यांची शासनाकडेही तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा नियोजन विभागातर्फे मिळणाऱ्या निधीतून शाळांमध्ये वर्ग खोल्या बांधण्याबाबत शिक्षणाधिकारी अकलाडे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांशी चर्चा न करता परस्पर शाळांची यादी तयार केली. यामध्ये जिल्ह्यातील एकूण ५९ शाळांमधील १०२ वर्ग खोल्यांचा समावेश आहे. तसेच यासाठी एकूण ९ कोटींचा निधी लागणार आहे. अकलाडे यांनी शाळांची ही यादी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांची लेखी परवानगी अथवा तोंडी परवानगी न घेता परस्पर हा प्रस्ताव तयार केला. नियमाप्रमाणे जिल्हा परिषदेतील कुठल्याही कामासाठी अध्यक्षांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र,अकलाडे यांनी वर्ग खोल्यांबाबत प्रस्ताव तयार करतांना अध्यक्षांची ना इतर कुठल्याही वरिष्ठांची परवानगी न घेता परस्पर हा प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन विभागाकडे पाठविण्याची तयारी केल्यामुळे नाना भाऊ महाजन यांनी या प्रकाराबाबत अकलाडे यांची मंगळवारी अध्यक्षांकडे तक्रार करून तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, या प्रकाराबाबत लोकमत प्रतिनिधीने भाऊसाहेब अकलाडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा दूरध्वनी बंद होता.
इन्फो
प्राथमिकचे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अकलाडे यांनी अध्यक्ष या नात्याने माझीही परवानगी न घेता, परस्पर परस्पर वर्ग खोल्या बांधण्याबाबतचा प्रस्ताव तयार केल्याची तक्रार जि. प. सदस्य नाना भाऊ महाजन यांनी माझ्याकडे केली आहे. या प्रकाराबाबत अध्यक्ष या नात्याने मी जि.प.सीईओ यांच्याकडे तक्रार करणार आहे.
रंजना पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद
इन्फो
प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी नऊ कोटींच्या घरातील कामांचा अध्यक्षांच्या परवानगी शिवाय प्रस्ताव कसा तयार करू शकतात, त्यांना हा अधिकार नसून, परवानगीचे अधिकार सदस्यांनी अध्यक्षांना दिले आहेत. अकलाडे यांनी अध्यक्ष यांच्यासह सभागृहाचीही दिशाभूल केल्या प्रकरणी त्यांची मी शासनाकडे तक्रार करणार आहे.
नाना भाऊ महाजन, सदस्य, जिल्हा परिषद