चोपडा : येथील मण्यार अळी मधील रहिवासी शेख अय्युब शेख युसूफ (४५) याने त्याच्या नावावर शेती नसतांना दुसऱ्याच्या शेतीचे बनावट (खोटे) दस्ताऐवज बनवून सौदा पावती केली व बँक खात्यात पैसे नसताना धनादेश दिल्या प्रकरणी शेख अय्युब शेख युसूफ याच्या विरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. याबाबतचा खटला चोपडा न्यायालयात सुरू होता. ४ रोजी निकाल लागला असून त्यात तीन वर्षांची सक्त मजुरी व दहा हजार रु दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.याबाबत सविस्तर असे की, चोपडा येथील गुजराथी गल्लीतील रहिवासी मोहनलाल घनश्याम गुजराथी यांच्या फिर्यादीवरून १० जुलै २०१० रोजी येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शेख अय्युब शेख युसूफ याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीत गुजराथी यांनी म्हटले होते की, मामलदे ता. चोपडा शिवारातील शेत गट नं ३९/२ क्षेत्र ४ हेक्टर ही जमीन वनाबाई वेडू मराठे यांच्या नावावर असतांना आरोपीने सदर शेती त्याच्या नावावर असलेबाबत खोटा दस्तऐवज तयार करून खरा असल्याचे भासवून सौदा पावती करून फसवणूक केली व बँक खातेवर रक्कम नसताना खोटा धनादेश दिला व विश्वासघात केला.सदर गुन्ह्यातील आरोपीस ११/१२/२०१२ रोजी अटक करण्यात आली होती. या खटल्याचा निकाल ४ रोजी जाहीर झाला असून सरकार तर्फे सरकारी वकील जी बी खिल्लारे यांनी काम पाहिले. न्यायाधीश ग. दि. लांडबळे यांनी आरोपीस शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात ४ साक्षीदारांना तपासण्यात आले. भादवी कलम ४२०, ४७१ नुसार शेख अय्युब शेख युसूफ यास ३ वर्षे सक्त मजुरी व दहा हजार रु दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.या खटल्यासाठी पैरवी अधिकारी म्हणून पो.हे.कॉ. अंबादास चौधरी व केस वाच म्हणून पो.कॉ. संदीप निळे यांनी मदत केली.
फसवणूक प्रकरणात एकास तीन वर्षे शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 4:25 PM