चोपडा, जि.जळगाव : शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे एकमेव साधन असून त्यातूनच समाजमन बदलते व सकारात्मक समाजपरिवर्तन घडून येते. शाळेतील विद्यार्थी हे काजवे असतात तर शाळा ही काजव्यांनी लखलखणारी झाड असते. या काजव्यांना मात्र आपल्या आत्म प्रकाशाची जाणीव नसते; ही जाणीव निर्माण करून त्यांना आत्मभान देण्याचे कार्य शाळा, शिक्षक, पालक व समाजाने करावयाला हवे असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ.राजा दांडेकर यांनी केले.चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिराच्या १०२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.तत्पूर्वी पी.ए.नागपुरे, पी.बी.कोळी, डी.एम.वैद्य व त्यांच्या चमूने सादर केलेल्या ईशस्तवनाने सुरुवात झाली. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देताना मुख्याध्यापक डी.व्ही.याज्ञिक यांनी संस्थेचा आढावा घेतला.संस्थेच्या देणगीदारांचा देखील यावेळेस सत्कार करण्यात आला. प्रताप प्रज्ञाशोध परीक्षेत शाळेतून सर्वप्रथम आलेल्या वेदांत महेश नेवे, राष्ट्रीय पातळीवरील महा रंगभरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या ओम उमेश चौधरी, राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या राजवी बन्सीलाल पाटील, तसेच दहावीच्या शालांत परीक्षेत शाळेतून सर्वप्रथम आलेल्या व उमा सुवर्णपदकाचा विजेता सागर प्रवीण महाजन आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवसुद्धा यावेळी करण्यात आला.माजी सचिव संध्या मयूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'संध्या मयूर डिस्टींगविश टीचर अवार्ड' यावेळी पर्यवेक्षक वाय.एच.चौधरी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शालेय वर्धापन दिनानिमित्त तोंड गोड करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात देणगीदार अनिल शर्मा यांच्या हस्ते पेढ्यांचा बॉक्स वाटून खाऊ वाटप करण्यात आले.अध्यक्षीय मनोगतातून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी समाजपरिवर्तनाचे माध्यम म्हणून शिक्षणाची अपरिहार्यता अधोरेखित केली.यावेळी चोपडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व्ही.सी.गुजराथी, उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर, कार्यकारिणी सदस्य शैलाबेन मयूर, उर्मिलाबेन गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी तसेच प्रफुल्लभाई गुजराथी, किरणभाई गुजराथी, प्रवीणभाई गुजराथी, संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हासभाई गुजराथी, डॉ.विकास हरताळकर,विजय पोतदार,पंचायत समिती सभापती कल्पना पाटील, नगर पालिका गटनेते जीवन चौधरी, संस्थेचे देणगीदार अनिल शर्मा, डी.एस.पांडव, ए.ए.ढबू, डी.के.महाजन, ए.एस.बाविस्कर, पी.व्ही.जोशी, पी.ए. पाटील, के.ए.पाटील व प्रताप विद्यामंदिराचे मुख्याध्यापक डी.व्ही.याज्ञिक आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन ए.एन.भट, व्ही.ए.गोसावी यांनी तर आभारप्रदर्शन उपमुख्याध्यापक महाजन यांनी केले.
शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे एकमेव माध्यम : राजा दांडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 4:35 PM